वाढत्या अपेक्षांमुळे उलटत चालले विवाहाचे वय ! 

चेतना चौधरी
गुरुवार, 20 एप्रिल 2017

धुळे - शिक्षणाच्या वाढत्या सुविधांमुळे आज अगदी खेडोपाडीही किमान बारावीपर्यंतच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने गेल्या पंधरा-वीस वर्षांत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अगदी खेडेगावातही अनेक मुली पदवीपर्यंत व त्याही पुढे शिक्षण घेतलेल्या आहेत. शहरात हेच प्रमाण जास्त आहे. ही समाधानाची बाब असली तरी या वाढलेल्या शिक्षणाने सर्वच समाजासमोर एक वेगळाच प्रश्‍न उभा राहिला आहे. मुली शिकल्या, त्यामुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या, किमान आपल्यापेक्षा जास्त शिकलेला अन नोकरीवाला मुलगा असावा ही मुलींची अपेक्षा पूर्ण करणारे अनुरूप मुले मिळत नसल्याने मुलींचे विवाहाचे वय उलटत चालले आहे. 

गेल्या काही दिवसांत मुलींचे प्रमाण घटले आहे. सध्या जिल्ह्यात विवाहयोग्य बावीसशे मुलांमागे 922 विवाहयोग्य मुली आहेत, हे प्रमाण वधू-वर परिचय मेळाव्यातून पुढे आले. मुलींचे प्रमाण खूप कमी असल्याने अनेक मुले भेटतील या आशेने अनुरूप उपवराच्या शोधात मुलीकडचे नातेवाईकही वर्षानुवर्षे संशोधन सुरू ठेवतात. नोकरीवालाच हवा, शेती हवी पण शेतकरी नको, घर स्वतःचे असावे या अपेक्षांसह योग्य मुलाचा शोध घेत मुलींच्या घटत्या प्रमाणाचे पालकही भांडवल करतात. या सर्व प्रकारात शेतकरी, मजूर किंवा सामान्य नोकरदारास मुलगीच मिळेनासे झाले आहे. 

तिशीनंतरचा विवाह समस्या 
अनुरूप जोडीदाराच्या शोधात मुलामुलींचे वय तीस वर्ष पार करते. उशिरा लग्न झाल्याने साहजिकच घरात बाळही उशिरा येते. तोपर्यंत घरातील वडीलधारे शारीरिकदृष्ट्या थकल्याने बाळाचा सांभाळ करण्याइतकी ऊर्जा त्यांच्यात नसते. अनुरूप जोडीदाराच्या शोधात विवाहाचे वयही वाढते. सखोल संशोधनानंतरही अनुरूप जोडीदार मिळाला नाही तर काहीवेळा तडजोड करण्याची भूमिका पालकांकडून घेतली जाते. त्यामुळे तिशी-पस्तीशीत नको त्या बाबतीत तडजोड करण्यापेक्षा पालकांनीही वेळीच समजदारपणा बाळगायला हवा अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक व्यक्‍त करतात. 

समकक्षाची वाढती अपेक्षा 
समाजात मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. आरक्षणामुळे काही ठिकाणी मुलींना लवकर नोकरी लागते पण त्या समाजात मुले अल्पशिक्षित राहतात. अशावेळी आपल्यापेक्षा कमी शिकलेला मुलगा नवरा म्हणून पसंत करणे मुली टाळतात. नोकरीवाला असेल तरीही त्याला थोडी शेती आणि स्वतःचे घर हवे शिवाय उच्चशिक्षित, लहान परिवार, नोकरीच्या ठिकाणी मुलगा एकटाच हवा अशी अपेक्षा मुलींची असते. अनेकदा ती पूर्ण न झाल्याने मुलींचे विवाहाचे वय वाढत आहे. पूर्वीच्या घरंदाजपणा, आदर्श शिक्षण, पारिवारिक व सामाजिक वातावरण या अपेक्षांना आता उच्चशिक्षण आणि नोकरी या पर्यायांनी छेद दिला आहे. 

करिअरचा हट्टही अतीच 
विवाहाची जबाबदारी पडण्यापूर्वी करिअर घडविणे हल्लीच्या मुलामुलींना योग्य वाटते. मग शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षांच्या नादात त्यांच्याही नकळत विवाहयोग्य वय वाढत जाते. नोकरी मिळाल्यानंतरही तीत स्थैर्य हवे अशा अपेक्षेने काही मुले स्वतःच उशिरा बोहल्यावर चढतात. अशीच स्थिती मुलींच्या बाबतीत असते नोकरीच्या शहरातीलच जोडीदार हवा, लग्नानंतर वाढत्या जबाबदाऱ्या ओळखून विवाहाआधीच मुलीही आपले करिअर घडविण्यात मग्न असल्याने बोहल्यावरचे वयही निघून जाते आहे. 

मुलींचे विवाहाचे वय जास्ती जास्त 24 तर मुलांचे 26-27 असायला पाहिजे, मात्र पालकांच्या हट्टापायी ते पस्तीशीपर्यंत पोहोचले आहे. योग्य वेळी मुलामुलींचे लग्न झाले तर सामाजिक अस्थैर्य कमी व्हायला मदतच होईल. पालकांनीही नोकरीवाल्यांचा नाहक हट्ट सोडून देत मुला-मुलींनाही जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य द्यायला हवे. 
- प्राचार्य व्ही. के. भदाणे, कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ वधू-वर परिचय कक्ष. 

Web Title: age of marriage rising