अमरिशभाई तिथे आम्ही...!

सचिन पाटील
बुधवार, 31 जुलै 2019

शेतकरी म्हणून अमरिशभाईंच्या कृषी विकास धोरणाचा पाठीराखा आहे. शिरपूर पॅटर्नद्वारे त्यांनी तालुक्‍यात समृद्धी साकारली. यंदाच्या पावसाळ्यात बंधारे काठोकाठ भरले. हे काम अधिक प्रभावीपणे व्हावे म्हणून ते सत्ताधारी पक्षासोबत जात असतील तर त्यात काहीच वावगे नाही. तालुक्‍याच्या विकासासाठी कायमच त्यांच्या सोबत आहोत.
- प्रसन्न जैन, अध्यक्ष, शिरपूर मर्चंट बॅंक

शिरपूर - आमदार अमरिशभाई पटेल यांची विकासाभिमुख धोरणे आम्हाला काँग्रेसकडे खेचून आणणारी ठरली. आमच्यासाठी अमरिशभाई हाच पक्ष आहे. ते जातील तेथे आम्ही असू. तालुक्‍याच्या हितासाठी आम्ही नेहमीच अमरिशभाईंसोबत राहू, अशी प्रतिक्रिया येथील समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहे.

काँग्रेसची ३५ वर्षांहून अधिक काळ खांद्यावर धुरा वाहणारे अमरिशभाई भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित मानले जाते. ‘सकाळ’ने रविवारी (ता. २८) ठळक वृत्तही प्रकाशित केले. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचा कानोसा घेतला असता ते अमरिशभाईं सोबतच राहतील. पर्यायाने भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन्मान राखून सोबत
यासंदर्भात उमटणाऱ्या प्रतिक्रिया दखल घेण्याजोग्या आहेत. विकासासाठी सत्तेचा कसा उपयोग करून घ्यावा हे अमरिशभाईंकडून शिकण्यासारखे आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांनी तालुक्‍याचा विकास केला व करीत आहेत. त्यांचा प्रत्येक निर्णय जनहित केंद्रस्थानी ठेवून होतो.

त्यामुळे तालुक्‍यातील जनता नेहमीच त्यांच्यासोबत राहिली, यापुढेही सोबतच राहील. कार्यकर्तृत्वाने त्यांनी तालुक्‍यात अमरिशभाई म्हणजेच पक्ष, असे समीकरण रूढ केले. पक्षप्रवेशाबद्दल त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सन्मान राखून त्यांच्यासोबत जाऊ, अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या गटातून देण्यात येत आहेत. 

भाजपमध्ये खासगीत आनंद
दुसरीकडे भारतीय जनता पक्षातून काहीशी सावध भूमिका घेण्यात आल्याचे दिसते. भाजपमधील एक गट अमरिशभाईंसारखा सक्षम नेता पक्षात प्रवेश करीत असल्याबद्दल खासगीत आनंद व्यक्त करताना दिसतो. मात्र पक्षशिस्त म्हणून सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया देण्याचे टाळले जात असल्याचे जाणवते. पक्षाचा प्रत्येक आदेश, निर्णय शिरसावंद्य असतो, त्यामुळे अमरिशभाई भाजपमध्ये येतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

समीकरणे बदलणार
अमरिशभाईंच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस आणि भाजपमधील समीकरणे बदलणार आहेत. अमरिशभाईंनंतर काँग्रेसला वाली कोण, त्यांच्याशी मतभेद झाल्याने पूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांकडून कोणती भूमिका घेतली जाईल, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना होणारी ही मोठी उलथापालथ तालुक्‍याला कशी व किती मानवणार, व्यक्तीपेक्षा पक्षनिष्ठा मोठी म्हणणाऱ्यांची कसोटी लागणार का, आपल्या दिग्विजयी फौजेसह अमरिशभाई भाजपमध्ये आल्यावर पदांचे वाटप कसे होणार, भाजपच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे काय, असे अनेक प्रश्न या घडामोडीपूर्वीच चर्चेत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष पक्ष प्रवेशाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सातत्यपूर्ण विकास कार्याने अमरिशभाईंनी स्वतःला सिद्ध केले आहे. अमरिशभाई म्हणजेच पक्ष, असे चित्र तालुक्‍यात आहे. ते भाजपसोबत जाऊन विकास कार्याला अधिक गती देतील, असा विश्वास आहे. आम्ही नेहमीच त्यांच्या सोबत होतो, आहोत आणि राहू. ही माझ्यासकट तमाम काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
- सुभाष कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस, शिरपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrishbhai Patel Congress Politics Development Policy