
Nandurbar News : शहाद्यात खोदकाम करताना आढळले शिवलिंग अन् प्राचीन चबुतरा
शहादा : शहराला लागून असलेल्या कुकडेल भागातील शनिमंदिराच्या मागच्या बाजूला पुरातन भावसार समाज मढीच्या जागेवर खोदकाम करताना समाधीवजा शिवलिंग, चबुतरा व पादुका आढळून आल्या आहेत. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हा परिसर प्राचीन, ऐतिहासिक व धार्मिक भाग समजला जातो.
हेही वाचा: Nandurbar News : शेतकऱ्यांकडून कृषक मातेला साकडे ; शाकंभरी माता यात्रोत्सव
शहराला लागून वाहणाऱ्या गोमाई नदीच्या काठालगत शनिमंदिर आहे. त्याच्यामागे भावसार समाजाची जागा आहे. अनेक वर्षांपासून या भागात माणूस फिरकत नाही. भावसार माढीच्या या जागेवर खाली पुरातन समाधी, शिवलिंग व चबुतरा असल्याचे एका युवकाच्या स्वप्नात आले होते. या घटनेची माहिती शहरातील धार्मिक, सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव यांना समजली.
त्यांनी घटनेची सर्व माहिती घेत शहरातील जुन्या जाणत्यांकडून माहिती घेत भावसार समाजाचे अध्यक्ष शिरीष भावसार यांच्याशी चर्चा केली. त्या ठिकाणी खोदकाम करण्यास सुरवात केली. पाहता पाहता पाच-सहा फूट खोल खोदकाम गेल्यानंतर मंदिराच्या चबुतरा दिसून आला. आजूबाजूची सगळी माती बाजूला काढून चबुतराखाली समाधी शिवलिंग दिसून आले.
संपूर्ण जागा साफ करत मंदिराच्या चबुतरावर समाधी शिवलिंग स्वच्छ करण्यात आले. ही जागा खूप काळापासून रिकामी पडलेली होती. या भागात कोणाचेही येणे-जाणे नव्हते. या भागात १५० वर्षांपूर्वीची वसाहत असूनही या भागात मंदिर सापडेल, अशी कोणालाही शाश्वती नव्हती.
हेही वाचा: Nandurbar News : मोबाईल क्रांतीमुळे टपालपेटीचा रंग फिकट
खोलगल्ली परिसरात राहणारे वेदमूर्ती रमेश गणेश शास्त्री यांच्याशी याबाबत चर्चा केली असता, ते म्हणाले, ‘शहर गोमाई नदीच्या काठी असल्याने या भागात पुरातन धार्मिक व ऐतिहासिक गोष्टी आढळून येतात. नुकतेच प्रकाशा येथे देखील टेकडीवर देवीची मूर्ती आढळली. पाडळदा गावात जुन्या घराचे बांधकाम करीत असताना पुरातन वस्तू, तोफा आढळून आल्या.
यामुळे शहादा परिसरात ऐतिहासिक, धार्मिक बाबींना उजाळा मिळत आहे. कुकडेल परिसरातील शनिमंदिरामागे खोदकाम करीत असताना मंदिराचा चबुतरा, शिवलिंग आढळून आलेली आहेत. ही चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरताच शहर व परिसरातील भाविक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येऊ लागले आहेत.
हेही वाचा: Shani Dev : याच लोकांवर शनिदेव होतात प्रसन्न; तुम्ही यात आहात का?
''शनिमंदिरामागे असलेल्या भावसार मढीच्या जागेत शिवलिंग असल्याचे समजल्यावर मी त्या जागेवर पाहणी केली. भावसार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिरीष भावसार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या जागेवर खोदकाम सुरू केले. पाहता पाहता तेथे शिवमंदिर, चबुतरा, समाधी, शिवलिंग आढळून आली.'' -श्याम जाधव (सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, शहादा)
''पूर्वी थोर ऐतिहासिक पुरुषांच्या समाधीस्थानी अशा छत्र्या बनविण्याची पद्धत होती. बऱ्याचदा युद्धात धारातीर्थी पडलेल्या लोकांच्या देखील अशा छत्र्या बनवत असत. ज्या भागात या वास्तू आढळून आल्या तो शहाद्याचा सर्वांत प्राचीन व पुरातन भाग आहे.
याच भागात यादव काळातील पंचमुखी महादेव मंदिर, तसेच रामेश्वर मंदिर आदी प्राचीन वास्तू आहेत. होळकरांच्या काळातीलही कागदपत्रांत या मंदिरांच्या संदर्भात माहिती मिळते. असेच आणखी एक मंदिर तेथे आहे, जे मी लहानपणी पाहिले आहे.'' - रमेश गणेश शास्त्री, वेदमूर्ती