डॉक्‍टरांच्या रूपात 'त्यांना' भेटले देवदूत...

The angels met them as doctors ....jpg
The angels met them as doctors ....jpg

नाशिक : आजार असा असाध्य, की वाटावे सारे काही संपले... पण वैद्यकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत झाली, त्याच्या सहाय्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉक्‍टर हा देव असतो, या उक्‍तीचा प्रत्यय देणारे परिश्रम सार्थकी लागले. डॉक्‍टर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपात जणू देवदूत भेटीला आले. ज्यांच्या जिवावर बेतले, अशांनी दुर्दम्य इच्छाशक्‍ती दाखवली अन्‌ चमत्कार वाटावा, असे जीवदान मिळाले. हे केवळ दूर, परक्‍या विकसित देशातच घडते असे नाही. आपल्या आजूबाजूला हेल्थ हब म्हणून विकसित होणाऱ्या नाशिकमध्येही अशा अनेक घटना घडल्या आहेत. 

यशस्वी उपचारांवर दृष्टिक्षेप... 
रोबोटिक तंत्रज्ञानाने जीवदान

संदीप बर्डे हा खेडले झुंगे (ता. निफाड) येथील 26 वर्षांचा तरुण. "रेक्‍टल प्रोलॅप्स' नावाच्या मोठ्या आतड्याच्या विकाराने त्रस्त होता. जन्मापासून दोन्ही मूत्रपिंडांची जागा बदलली होती. नैसर्गिक विधीवेळी मोठे आतडे बाहेर यायचे, रक्‍तस्त्राव व्हायचा. 
असह्य वेदना व्हायच्या. उपचार गुंतागुंतीचे होते. संकटे कधीही एकटी येत नाहीत. जेमतेम आर्थिक परिस्थितीमुळे उपचार व शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसाही नव्हता. घराला लागलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याने सरकारी योजनेचा लाभही घेता येत नव्हता. अशावेळी एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डॉ. राज नगरकर व त्यांचे सहकारी देवदूत बनून मदतीला आले. संदीपवर यशस्वीरीत्या रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. नगरकर यांनी संदीपवर मोफत उपचार केलेच. शिवाय टाळता न येणाऱ्या खर्चासाठी आवश्‍यक तीन ते चार लाख उभे करण्यात आले. डॉ. नगरकर म्हणाले, की आजार गुंतागुंतीचा होता. टाक्‍यांची शस्त्रक्रिया केली असती, तर प्रतिकारशक्ती कमी झाली असती. रोजची कामे करणेही अवघड झाले असते. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. मोठे आतडे स्टेपलर्सच्या मदतीने आतल्या आत जोडून दिले. शस्त्रक्रियेनंतर सहा तासांनी संदीप चालायला लागला. 
 
मेंदूच्या धमनीवर जोखमीची ऍन्जिओप्लास्टी 

कळवण येथील सीताराम साबळे यांचे वय 65 वर्षे. मेंदूला रक्‍तपुरवठा करणाऱ्या धमनीची कार्यक्षमता दहा टक्‍क्‍यांवर आल्याचे निदान झाल्यामुळे ऍन्जिओप्लास्टीचा सल्ला मिळाला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया त्यांना झेपणारी नव्हती. त्या वेळी संदर्भसेवा रुग्णालय आणि तिथले हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अतुल पाटील, रुग्णालय अधीक्षक डॉ. नामपल्ली मदतीला धावले. 
मेंदूच्या धमनीवर अतिशय किचकट आणि जोखमीची मानली जाणारी ऍन्जिओप्लास्टी केली. उत्तर महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयातील अशा प्रकारची ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला स्ट्रोकचा धोका अधिक असल्याने एमबोलिक प्रोटेक्‍शन डिव्हाईसचा (ईपीडी) वापर केला. साबळे यांची इच्छाशक्‍ती सोबतीला होतीच. जणू त्यांना पुनर्जन्मच मिळाला. 


होमिओपॅथीद्वारे आठ तासांत प्लेटलेट दुप्पट 

थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणून रक्‍तातील प्लेटलेट कमी होण्याच्या आजाराचे निदान नगर जिल्ह्यातील अकोले येथील रुदविका मनोज रासने या अकरा महिन्यांच्या चिमुकलीचे झाले. अशावेळी घाबरून लोक हवा तितका पैसा खर्च करण्याची तयारी ठेवतात. प्रचलित उपचारपद्धतीच्याच मागे धावतात. रासने कुटुंबीयांनी तत्काळ होमिओपॅथ डॉ. मुकेश मुसळे यांच्याशी संपर्क साधला. रक्त तपासणीत प्लेटलेट अत्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले. डेंगीसारख्या आजाराची शक्‍यता होती. 
तरीही रासने यांनी डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवला. होमिओपॅथीची औषधे घेतली. रुदविकाला प्रचंड ताप होता. रुग्णालयात भरती करण्याची नितांत गरज होती. अशावेळी डॉ. मुसळे यांच्या होमिओपॅथी उपचाराने केवळ आठ तासांत प्लेटलेटची संख्या 44 हजारांवरून 84 हजारांपर्यंत, तर 24 तासांत एक लाख 29 हजारांपर्यंत पोचली. मुलीच्या जिवाचा धोका टळला. 

पोटापाण्यासाठी बिहारमधून नाशिकमध्ये आलेल्या परप्रांतीय कुटुंबातील पाचवर्षीय सन्ताना शेख गॅस सिलिंडरच्या स्फोटात जवळपास 35 टक्‍के भाजली होती. या स्फोटात तिचे आई-वडील व भावाचा मृत्यू झाला होता. घरातले सगळेच त्या अपघातात सापडल्याने जवळचे कुणी नातेवाईकही तिच्या सोबत नव्हते. डॉ. अनिता नेहते यांच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये तिला आणले, तेव्हा प्रकृती इतकी गंभीर होती, की सलाईनसाठी धमनीही मिळत नसल्याने उपचार सुरू करण्यासाठीही एक तास लागला. निराधार सन्तानावर केवळ मोफत उपचार, शस्त्रक्रियाच झाल्या नाहीत, तर दोन-तीन महिने तिचा सांभाळ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी घरच्या मुलीसारखा केला. मानसिक बळ दिले. बरी झाल्यानंतर एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तिला आश्रमशाळेत शिकण्यासाठी दाखल करण्यात आले. अनाथ सन्तानाला नंतर एका अमेरिकन जोडप्याने दत्तक घेतले. सध्या ती अमेरिकेत शिक्षण घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com