चंद्रकांतदादांनी दाखविलेल्या धाडसाचे अभिनंदन ः एकनाथ खडसे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याचे बीज भारतीय जनता पक्षाच्या मेगा भरतीतच रोवले गेले होते,पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीबाबत विधान करून वस्तुस्थिती मान्य केली त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करीत आहोत. आता ती सुधारून पक्ष नव्याने निष्ठावंत लोकांना संधी देण्याबाबत विचार करेल असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव : राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जावून महाविकास आघाडीचे नवीन सरकार आले. भाजपमधील मेगा भरतीमुळे पक्षातील निष्ठावंतावर अन्याय झाला आणि जे बाहेरून आले त्यांना मोठी पदे देण्यात आली. या अगोदर केवळ मीच बोलत होतो, आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीही मान्य केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मेगा भरतीबाबतची वस्तुस्थिती मांडली, त्यांनी ते बोलण्याचे धाडस दाखविले त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन असल्याचे एकनाथ खडसे यांनी आज येथे सांगितले. 

हेही पहा - भाजपनेच रंधेंना न्याय दिला; कारभाराचे मॉनेटरींग करू

जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, कि भारतीय जनता पक्षात मेगा भरती प्रथमच झाली असे नाही, मात्र अगोदर सन 2009 च्या विधानसभा निवडणूकीच्या काळातही आपण भरती केली होती. मात्र त्यावेळी ज्यांची भरती झाली ते निवडून आले होते. मात्र आता भरती करण्यात आलेल्यामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. त्यांनाही भरती करून घेण्यात आले. त्यामुळे जे भरती करण्यात आले ते सर्व पडले. 

वाल्याचे वाल्मिकी होत नाही 
मेगा भरतीबाबत ते म्हणाले, कि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांचे आरोप तपासून घेवून त्यांना प्रवेश देण्याची गरज होती. मात्र अशी कोणतीही पार्श्‍वभूमी न पाहता ही भरती करण्यात आली, त्यांना उमेदवारीही देण्यात आली. केवळ भरती झाले म्हणून एकाएकी ते वाल्याचे वाल्मिकी होत नाही. त्यामुळे या भरती झालेल्या सर्वांचाच निवडणूकीत पराभव झाला. 

पक्ष यातून बोध घेईल 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगा भरतीतील चुक मान्य केली आहे. त्यामुळे आता पक्ष यातून निश्‍चितच बोध घेईल. नव्याने पक्षाची रचना करून निष्ठवंताना न्याय देईल अशी अपेक्षा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse bjp chandrakant patil