Dhule Crime News : धुळ्यात डेटा ऑपरेटर ताब्यात; कृषी कार्यालयात कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

Dhule Crime News : धुळ्यात डेटा ऑपरेटर ताब्यात; कृषी कार्यालयात कारवाई

धुळे : प्रधानमंत्री किसान योजनेच्या ऑनलाइन अर्जाच्या पडताळणीकामी तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचखोर कंत्राटी डेटा ऑपरेटरला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. २७) दुपारी धुळे तालुका कृषी कार्यालयात ही कारवाई केली. सुनील रामदास सूर्यवंशी असे लाचखोर कंत्राटी डेटा ऑपरेटरचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. (Anti-Corruption Squad Bribery contract data operator caught red-handed while accepting bribe online application verifier Dhule crime news)

तक्रारदार नाशिक येथे वास्तव्यास आहेत. त्यांची पुरमेपाडा (ता. धुळे) येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. शेतीचा तक्रारदाराच्या मातोश्रींना प्रधानमंत्री (पीएम) किसान योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, त्यांच्या आईचे २०१९ मध्ये निधन झाले. त्यामुळे योजनेचा लाभ मिळणे बंद झाले.

त्यामुळे तकारदार यांनी दोन वर्षांपूर्वी शेतीवर पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला. ऑनलाइन अर्जाच्या पडताळणीचे काम तलाठीकडून कृषी खात्याकडे देण्यात आले.

त्यामुळे तक्रारदार यांना धुळे तालुका कृषी कार्यालयातील कंत्राटी डेटा ऑपरेटर सुनील सूर्यवंशी याने तकारदार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांनी भरलेल्या पीएम किसान योजनेच्या ऑनलाइन अर्जाच्या पडताळणीसाठी कागदपत्रे देण्यास सांगितले.

त्यावेळी तक्रारदार यांनी ते नाशिक येथे राहत असल्याने नाशिकहून धुळे येथे येऊ शकत नसल्याचे सांगितले. नंतर कंत्राटी सूर्यवंशी याच्या व्हॉटस्अ‍ॅपवर कागदपत्रांच्या फोटोकॉपी पाठविल्या. तेव्हा सूर्यवंशी याने कामासाठी पैशांची मागणी केली. तडजोडीअंती रक्कम तीनशे रुपये इतकी ठरली.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची शहनिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास धुळे तालुका कृषी कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून ३०० रुपयांची लाच घेताना सुनील सूर्यवंशी याला रंगेहाथ पकडले.

त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक, धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, भूषण शेटे, प्रशांत बागूल, गायत्री पाटील, संतोष पावरा, संदीप कदम, रामदास बारेला, रोहिणी पवार, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.