अयोध्या येथील राम मंदिराच्या विटेचे पूजन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

रावेर. अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीत सुमारे २७ वर्षांपूर्वी झालेल्या कारसेवा दरम्यान येथील सीताराम रुपचंद लष्करे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने सोबत आणलेल्या विटेची त्यांच्या घरी अजूनही दररोज पूजा केली जाते. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीबाबत दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सीताराम लष्करे यांनी ही माहिती ‘सकाळ’ला दिली. 

रावेर. अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीत सुमारे २७ वर्षांपूर्वी झालेल्या कारसेवा दरम्यान येथील सीताराम रुपचंद लष्करे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने सोबत आणलेल्या विटेची त्यांच्या घरी अजूनही दररोज पूजा केली जाते. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीबाबत दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सीताराम लष्करे यांनी ही माहिती ‘सकाळ’ला दिली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या सीताराम लष्करे यांचे वडील रुपचंद लष्करे व आजोबा गणपत लष्करे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना जळगावला आले होते. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील ज्या मोजक्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला, त्यात गणपत गोविंदा लष्करे यांचा समावेश होता. तीन डिसेंबर १९९२ ला सीताराम लष्करे, प्रमोद रामचंद्र महाजन, विलास राजाराम पाटील, पांडुरंग काशिनाथ महाजन, जगदीश रामभाऊ महाजन, संजय उखर्डू पाटील, प्रकाश ऊर्फ बाळू रघुनाथ महाजन (फुलारी), संतोष जगन्नाथ महाजन हे सर्व युवक रेल्वेने आयोध्या येथे पोहोचले. त्यावेळी आयोध्या येथे हजारो युवक जमले होते. ६ डिसेंबर १९९२ ला सकाळी साडेदहाच्या सुमारास ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतंभरा यांच्या भाषणानंतर कारसेवेला प्रारंभ झाला. अत्यंत उत्साही असलेले आणि त्यावेळी केवळ २२ वर्षांचे सीताराम लष्करे थेट वादग्रस्त जागेवर चढले. कारसेवेत सक्रिय सहभाग घेतला. दुपारी चार वाजेपर्यंत कार सेवा पूर्ण झाली होती. या सर्व युवकांवर लष्कराने कारवाई करण्याच्या आतच तेथील आठवण म्हणून पडलेल्या बांधकामातील एक वीट सोबत घेऊन कार्यकर्ते रावेरमध्ये परतले. ही वीट प्राचीन राम मंदिराची असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शहरात आल्यावर ठिकठिकाणी श्री. लष्करे यांनी सोबत आणलेल्या विटेची पूजाही करण्यात आली होती. 

निकालानंतर आठवणी ताज्या 
आजही ही वीट श्री. लष्करे यांच्या देव्हाऱ्यात असून दररोज अन्य देवतांच्या बरोबरच या विटेची ही नित्य पूजा केली जाते. अयोध्येला गेलेल्या युवकांपैकी पांडुरंग महाजन आणि संतोष महाजन यांचे निधन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या सर्वांच्या २७ वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. श्री. लष्करे त्यावेळच्या आठवणी सांगतांना रंगून जातात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya ram tempal raver sitaram lashkare