पाच वर्षांत भरून काढणार विकासाचा अनुशेष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

जळगाव - गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी काही दिले नाही. विकासाचा हा अनुशेष आपले सरकार या पाच वर्षांत भरून काढेल, अशी ग्वाही देत पालिका निवडणुकांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही चाळीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवीत सत्ता कायम राखण्याचा निर्धार करा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

जळगाव - गेल्या पंधरा वर्षांत आघाडी सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी काही दिले नाही. विकासाचा हा अनुशेष आपले सरकार या पाच वर्षांत भरून काढेल, अशी ग्वाही देत पालिका निवडणुकांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही चाळीसपेक्षा अधिक जागांवर विजय मिळवीत सत्ता कायम राखण्याचा निर्धार करा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज येथील सरदार पटेल भवनात आयोजित भाजपच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार ए. टी. पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार हरिभाऊ जावळे, उन्मेष पाटील, संजय सावकारे, सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, चंदूलाल पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयाग कोळी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, किशोर काळकर, अशोक कांडेलकर, देवयानी ठाकरे, प्रा. डॉ. अस्मिता पाटील, गोविंद अग्रवाल, पोपटतात्या भोळे, वाडीलाल राठोड, दीपक सूर्यवंशी, मच्छिंद्र पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री महाजन म्हणाले, की जिल्ह्यातच नव्हे; तर संपूर्ण राज्यात पालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले. नोटाबंदीच्या निर्णयावरून विरोधक टीका करीत असले, तरी जनता भाजपसोबत आहे, हे या यशातून दिसून आले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागून पन्नास जागांवर विजय मिळविण्याचे "लक्ष्य' ठेवावे.

शिवस्मारक भूमिपूजनाचा उत्सव
तत्पूर्वी, आमदार उन्मेष पाटील यांनी 24 डिसेंबरला मुंबईत होत असलेल्या शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याची माहिती दिली. या ऐतिहासिक स्मारकाच्या पायाभरणीचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून, या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.

नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार
सरदार पटेल यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून बैठक सुरू झाली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांसह आमदार चंदूलाल पटेल यांचा सत्कार करण्यात आला. मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत मंत्री महाजन यांनी केले. प्रा. सुनील नेवे यांनी सूत्रसंचालन केले.

तालुक्‍यांचा गटनिहाय आढावा
संघटनमंत्री किशोर काळकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक तालुक्‍याच्या अध्यक्षांकडून गटप्रमुखांची नियुक्ती, तालुक्‍याची बैठक, मेळाव्यांबाबत आढावा घेतला. जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांना प्रत्येकी दहा हजार, तर पंचायत समितीसाठी पाच हजारांचे शुल्क आकारून अर्ज देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

समर्थकांची पुन्हा घोषणाबाजी!
पाठीच्या मणक्‍यावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईत असल्याने माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे उपस्थित नाहीत, असे सांगण्यात आले. मात्र, बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहात उपस्थित महाजन व खडसे समर्थकांनी आपापल्या नेत्यांच्या नावाने घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. "गिरीशभाऊ आगे बढो, एकच भाऊ... गिरीशभाऊ' अशा घोषणा आल्यानंतर मागून "नाथाभाऊ आगे बढो...' अशा घोषणा दिल्या जात होत्या. बराच वेळ हेच वातावरण होते. नंतर स्वत: महाजन यांनी "व्यक्तिगत' घोषणा कुणीही देऊ नये, असे बजावल्यानंतर ही घोषणाबाजी थांबली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: backlog of five years