Dhule Balaji Rathotsav : 144 वर्षांची परंपरा; ‘व्यंकट रमणा...गोविंदा’चा जयघोष
Dhule Balaji Rathotsav : ‘श्री व्यंकट रमणा...गोविंदा..., श्री भगवान बालाजी की जय’ असा भक्तिभावाने जयघोष करीत भाविकांनी श्रद्धेने श्री बालाजींचा रथ ओढला. शहरातील रथघरातून बाहेर काढलेल्या आणि सजविलेल्या रथावर बुधवारी (ता. २५) दुपारी मंदिराच्या गाभाऱ्यातील श्री भगवान बालाजी, श्री देवी लक्ष्मी आणि श्री पद्मावतीची मूर्ती विधिवत ठेवण्यात आली. केळीचा प्रसाद रथावर चढविल्यानंतर घंटानाद होताच भाविकांनी ‘व्यंकट रमणा...गोविंदा...’ असा गजर करीत श्री बालाजी रथ ओढण्यास सुरवात केली.( balaji rathotsav celebration in dhule news )
धुळे बाजार समितीतील हमाल-मापाड्यांनी रथाच्या चाकासमोर ठिकठिकाणी मोगऱ्या ठेवीत रथ उभा केला. त्यामुळे नागरिकांना दर्शनाची संधी मिळाली. शहरातील अग्रवाल परिवाराला रथावर विराजमान झालेल्या श्री बालाजींची पहिली पूजा, आरतीचा मान देण्यात आला.
श्री बालाजी रथोत्सव
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहरात परंपरेनुसार श्री बालाजी रथोत्सव साजरा केला जातो. शहरातील श्री बालाजी मंदिराशेजारी रथघर असून, त्यात सरासरी ३० फूट उंचीचा रथ असतो. घटस्थापनेपासून मंदिर व्यवस्थापनातर्फे रोज निरनिराळ्या वहनांची मिरवणूक काढली जाते. धुळ्यातील रथोत्सवाला १४४ वर्षांची परंपरा लाभली आहे. कोरोनाचा संसर्ग आणि अन्य कारणांचा अपवाद वगळला, तर दर वर्षी श्री बालाजी रथोत्सव साजरा करण्यात आला. यंदा रथोत्सवात नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता.
आशीवार्दाची कामना
दसऱ्याच्या आदल्या दिवशी रथघरातून रथ बाहेर काढून तो स्वच्छ करण्यात आला. तसेच परराज्यातून आलेल्या कारागिरांनी विविध फुलांनी रथ सजविण्यास सुरवात केली. मंदिरात भगवान बालाजी, देवी लक्ष्मी आणि पद्मावतीची आरती झाल्यानंतर मूर्ती रथावर विराजमान करण्यात आल्या. नंतर भाविकांनी रथ ओढला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मिरवणुकीतील रथ ठिकठिकाणी दर्शनासाठी थांबविण्यात आला.
भाविकांनी भगवान बालाजींना प्रिय असलेल्या केळी रथावर पोचवीत आशीर्वादाची कामना केली. मध्यरात्री उशिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात रथोत्सव सुरू होता. अनेकांनी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढत रथाचे स्वागत केले. ठिकठिकाणी श्री भगवान बालाजींच्या रथावर पुष्पवृष्टी झाली. भाविकांना स्वयंसेवी संस्था व दानशूरांनी महाप्रसादाचे वाटप केले. रथोत्सवासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता.
श्री बालाजींची मूर्ती
रथावरील श्री बालाजींची मूर्ती (स्व.) विष्णुप्रसाद काकड यांचे आजोबा (स्व.) रामविलास महाराज यांनी आणली होती. (स्व.) रामविलास महाराज यांच्या स्वप्नात श्री बालाजी भगवान आले, त्यांना साक्षात्कार दिला. ही मूर्ती कोकणातील रत्नागिरी येथील पाचपिंपळाजवळील विहिरीमध्ये आहे, असे साक्षात्कारात सांगितले. त्यानुसार (स्व.) रामविलास महाराज यांनी ती मूर्ती धुळे येथे आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली.
तसेच रथासाठी राजस्थान येथून उत्तम कारागीर आणून (स्व.) बाबूलाल बालाराम अग्रवाल यांनी रथाची स्थापना केली. त्या रथात मूर्ती विराजमान करून रथोत्सवाला सुरवात केली. तेव्हापासून आजतागायत प्रथम आरतीचा मान (स्व.) बाबूलाल अग्रवाल यांच्यानंतर त्यांचे वारसदार हेच प्रामुख्याने प्रथम आरती करतात. रथोत्सवानिमित्त नवरात्रीचे संपूर्ण अकरा दिवस रोज श्री बालाजींचे वहन निघते.
पहिल्या आरतीचा मान
शहराला अग्रवाल परिवाराने मोठी संस्कृती दिली असून, त्यामुळे श्री बालाजी रथोत्सवाची १४४ वर्षांपासून परंपरा सुरू आहे. यात रथाच्या पहिल्या आरतीचा मान अग्रवाल परिवाराला देण्यात आला. (स्व.) बाबूलाल बालाराम अग्रवाल यांचे वारस कमलनयन बाबूलाल अग्रवाल, मंगलबाई कमलनयन अग्रवाल, मयुरेश कमलनयन अग्रवाल, कल्पेश कमलनयन अग्रवाल, वर्षा मयुरेश अग्रवाल, उज्ज्वला कल्पेश अग्रवाल, खुशी, योगिता, वैशाली, कार्तिकेय, गोविंदा अग्रवाल यांच्या हस्ते पहिली मानाची आरती झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.