पाऊण टक्के व्याजदर कमी केला तरच ग्राहकांचा फायदा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

रिझर्व्ह बॅंक रेपो दरात कपात करो अथवा व्याजदरात कपात करो, जोपर्यंत स्थानिक बॅंका, खासगी बॅंका (नॉन बॅंकिंग फायनान्शियल कंपन्या) रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाप्रमाणे व्याजदर कमी करीत नाही तोपर्यंत ग्राहकांना त्यांचा फायदा मिळणार नाही. जिल्ह्यातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री पावसावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

जळगाव - रिझर्व्ह बॅंक रेपो दरात कपात करो अथवा व्याजदरात कपात करो, जोपर्यंत स्थानिक बॅंका, खासगी बॅंका (नॉन बॅंकिंग फायनान्शियल कंपन्या) रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाप्रमाणे व्याजदर कमी करीत नाही तोपर्यंत ग्राहकांना त्यांचा फायदा मिळणार नाही. जिल्ह्यातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री पावसावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. पाऊस पडून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात भरघोस उत्पादन येत नाही, त्याच्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची वाटचाल झळाळीकडे होणार नाही.

पाऊस चांगला झाल्यानंतरच तेजी
कुणाल पांडे (संचालक, आदित्य होंडा) - रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केली असली तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजवर फारसा परिणाम जाणवणार नाही. जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेचे गणित कृषीक्षेत्रावर विशेषतः कापसावर अवलंबून असते. आठ जून उजाडला तरी पाऊस नाही.

शेतकऱ्यांच्या हातात पैसा येत नाही तोपर्यंत ऑटोमोबाईल क्षेत्रात झळाळी येणार नाही. मागील गणेशोत्सवापासून ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आहे. ग्राहक येऊन वाहने पाहून जातात, पसंतही करतात. मात्र पाऊस चांगला होऊ द्या, येत्या गणपती, दसरा दिवाळीत नवीन वाहन घेण्यावर अधिक ग्राहकांचा कल असतो. ज्यांना वाहन घ्यायचेच आहे ते व्याजदराची काळजी करीत नाहीत. 

आणखी रेपोदर कमी हवा
योगेश चौधरी (संचालक, पंकज टीव्हीएस) -
 पाऊण टक्के कपात केल्याने ग्राहकांच्या खरेदीत फरक पडणार नाही. दोन ते तीन टक्के व्याजदरात कपात करायला हवी होती. सोबतच बॅंका रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर कमी केला तो किती प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोचवितात यावरही ग्राहकांची क्रयशक्ती अवलंबून असते. पाऊण टक्‍का कमी झाला तरी विशेष असा परिणाम होणार नाही.

बॅंकांनी व्याजदर कमी करावे
नितीन रायसोनी (संचालक, श्रेयांस ऑटोमोबाईल) -
 रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात परिणामतः व्याजदरात पाऊण टक्का कपात केली, तर ग्राहकांना फायदेशीर आहे. त्यांच्या व्याजाचा हप्ता कमी होईल. मात्र बॅंकांनी विशेषतः नॉन फायनान्शियल फायनान्स कंपन्यांनी कमी झालेले व्याज दर लागू करायला पाहिजे. तोपर्यंत ग्राहकांना फायदा होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Interest rate Decrease Customer Profit