क्षणभर थांबलो असतो, तर अनर्थ अटळ होता... - सलीम शेख

सुधाकर पाटील
बुधवार, 12 जुलै 2017

भडगाव (जि. जळगाव) - 'रात्री सव्वाआठच्या सुमारास बस घेऊन अनंतनागहून कटराकडे निघालो. नुकतेच एका टायरचे पंक्‍चर काढले असल्याने गाडी बेताने चालवत होतो. थोडे अंतर गेल्यावर उजव्या बाजूने गाडीवर काही आदळत असल्याचे जाणवले. आवाज वाढला अन्‌ हा गोळीबार असल्याचे लक्षात आले. गाडीवर सटासट गोळ्या आदळत होत्या. खिडक्‍यांच्या काचा फुटत होत्या. बाजूला काय होतेय याची जाणीव झाल्याने क्षणभर हबकलो... पण, अगदी क्षणभरच..! त्याक्षणी एकच विचार मनात चमकला अन्‌ जमेल तितक्‍या वेगाने गाडी पळवली, ती थेट अडीच किलोमीटरवरील लष्कराच्या तळावर जाऊनच थांबलो...'' सलीम शेख "सकाळ'शी बोलत होते!

अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या ज्या बसवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला, तिचे सलीम शेख हे चालक. मूळचे जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्‍यातील पिंपरखेडचे. सलीम आणि त्यांच्या भावाच्या नोकरीमुळे शेख कुटुंब बलसाडमध्ये स्थायिक झाले आहे. बलसाडच्या ओम ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसवर ते चालक आहेत. तिथल्या स्थानिक भाविकांना घेऊन ते दोन जुलैला अमरनाथ यात्रेसाठी गेले होते.

सलीम यांनी दहशतवादी हल्ल्यादरम्यान दाखवलेल्या अतुलनीय धैर्य अन्‌ समयसुचकतेचे देशभरातून कौतुक होत आहे; पण सलीम यांची स्थिती मात्र "एका डोळ्यात हसू नि दुसऱ्यात आसू,' अशी झाली आहे. बसमधील 52 प्रवाशांना वाचवल्याचा आनंद असतानाच ज्यांच्या सहवासात गेले दहा-बारा दिवस रमलो, त्यातील आठ जणांना वाचवू शकलो नसल्याचे शल्यही सलीम यांच्या बोलण्यातून जाणवत होते. घाबरलेल्या प्रवाशांच्या आकांतामुळे बस थांबविली असती, तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. सगळ्यांचाच जीव धोक्‍यात आला असता, असे सांगून सलीम म्हणाले, की गोळीबार सुरू असतानाही बस वेगाने पुढे नेण्याची बुद्धी अन्‌ ते करण्याची ताकद कुठून मिळाली कुणास ठाऊक; पण हे करू शकलो. आपण त्या काही क्षणी जे काही केले, त्याचे मोल आता जाणवते आहे.

अमरनाथ दर्शनानंतर आम्ही वैष्णोदेवीला जाण्यासाठी कटाऱ्याकडे निघालो होतो, असे सांगून सलीम म्हणाले, ""प्रवासादरम्यान दुपारी चारच्या सुमारास टायर पंक्‍चर झाल्याने वाहनांच्या ताफ्यातून आमची बस मागे राहिली होती. टायर बदलल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. अनंतनागजवळून पुढे निघालो असताना रात्री सव्वाआठच्या सुमारास अचानक समोरच्या उजव्या बाजूने काही आदळू लागले. काही मीटर जाईपर्यंत गोळीबार होत असल्याचे लक्षात आले. बस थांबण्यासाठी दहशतवाद्यांनी टायरवरही गोळ्या झाडल्या. क्षणार्धात गती वाढवत मी बस पुढे दामटली; पण तोवर 30-40 गोळ्या बसवर आदळल्या.

प्रवाशांमध्ये हलकल्लोळ उडाला. बसच्या त्या बाजूच्या पत्र्यात गोळ्या घुसण्याचा, काचा फुटण्याचा आवाज अन्‌ प्रवाशांचा आकांत कानी येत होता; पण थांबलो असतो, तर कदाचित कुणीच वाचले नसते.

हल्ल्याच्या ठिकाणापासून दोन-अडीच किलोमीटरवर लष्कराचा तळ होता. तो दिसताच बस थेट तिथपर्यंत नेली. बसवर हल्ला झाल्याचे गेटवर सांगताच जवानांनी तळावर बस नेऊन आतील सर्वांना सुरक्षा पुरवली.''

पिंपरखेडचा उरही अभिमानाने भरला!
जळगाव जिल्ह्यातील पिंपरखेडचे सलीम शेख दहा-बारा वर्षांपासून नोकरीनिमित्त बलसाडला स्थायिक झाले आहेत. घरातील चौघा भावांपैकी सलीम आणि इतर दोन भाऊ चालक आहेत, तर लहान भावाचा शिलाई व्यवसाय आहे. या सगळ्यांचे पिंपरखेडला नेहमी येणे-जाणे असते. दोन दिवसांपूर्वीच वडील गफूर शेख पिंपरखेडला येऊन गेले. त्यांचे इतर भाऊबंद इथेच आहेत. सलीम यांच्या धाडसामुळे पिंपरखेडच्या ग्रामस्थांचा उरही अभिमानाने भरून आला आहे.

केंद्र, राज्यांकडून मदत जाहीर
-अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी सात लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केंद्राने जाहीर केली आहे.
- हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील दोन महिलांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.
- हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या गुजरातमधील नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत गुजरात सरकारने जाहीर केली आहे. तसेच हल्ला झालेल्या बसचा चालक सलीम शेख याच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी गुजरातकडून करण्यात येणार आहे.
- जम्मू आणि काश्‍मीर सरकारने बसचालक सलीम शेख याला तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhadgav jalgav news The appeasement to save the lives of pilgrims