Dhule News : भुराबाई ठेलारींनी तोळाभर सोनपोत केली परत; संस्कारांचे मोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule News : भुराबाई ठेलारींनी तोळाभर सोनपोत केली परत; संस्कारांचे मोल

Dhule News : भुराबाई ठेलारींनी तोळाभर सोनपोत केली परत; संस्कारांचे मोल

कापडणे (जि. धुळे) : तिसगाव (ता. धुळे) येथील मनीषा पाटील पहाटे महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालून परतल्या. त्यांची आठ ग्रॅमपेक्षा (Gram) अधिक अन् सुमारे पन्नास हजारांची सोनपोत गळ्यातून निखळली. (Bhurabhai Thelari give back lost gold jewellery to owner dhule news)

हे घरी आल्यानंतर काही क्षणात लक्षात आले अन् पायाखालची जमीनच सरकली. सर्वसामान्य कुटुंबातील मनीषाबाई सुन्न झाल्या. ही सोनपोत भुराबाई ठेलारी (माने) यांना सापडली. त्यांचे पती प्रकाश ठेलारी यांनी गावात जाऊन कोणाची पोत हरवलीय याचा शोध घेतला अन् मनीषा पाटील यांचे घर गाठले. त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही..!

मनिषा पाटील महादेव मंदिरातून घरी आल्यावर आठ ग्रॅमपेक्षा अधिक सोनपोत गळ्यातून निखळल्याचे लक्षात आले. सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाल्याने संपूर्ण पाटील परिवार चिंतातुर झाला. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबासाठी हे मोठे आर्थिक संकट होते. त्यांनी घरासह आजूबाजूला शोधमोहीम सुरू केली, पण हाती काहीच लागले नाही.

भुराबाईंचा प्रामाणिकपण..!

भुराबई ठेलारी पहाटे साडेपाच सहाच्या सुमारास त्यांच्या दोन्ही मुलांना शहरातील शाळेत पाठविण्यासाठी बसस्थानकाकडे जात होत्या. त्याच वेळेस रस्त्यात सोनपोत सापडली. भुराबाईंसह मुलांना आनंद झाला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

पण लेकरांना स्वाभिमान आणि प्रामाणिकपणाचे धडे देणाऱ्या भुराबाईंनी सोनपोत परत करण्याचा निर्धार केला. मुलांनाही तसे सांगितले. घरी आल्या व पती प्रकाश ठेलारी यांना सांगितले. त्यांनी गावात तत्काळ जाऊन गल्लोगल्ली फिरून सोनपोत कोणाची हरवलीय याचा शोध घेतला अन् ठेलारी कुटुंबाने सोनपत परत केली.

स्वाभिमानी माने कुटुंब

मनीषा पाटील यांनी भुराबाईंना काही आर्थिक भेट देऊ केली, पण त्यांनी नाकारली. पाटील कुटुंबाने लाखात एक हिरकणीची उपमा देत, भुराबाईंचे औक्षण व हळदी-कुंकू देऊन प्रेमाची साडी भेट दिली. या वेळी दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद पाहायला मिळाला.

टॅग्स :DhulegoldJewellery