वय अवघे पाच वर्ष अन्‌ नऊ सुवर्ण पदकांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

जेमतेम पाच वर्ष असताना सायकलला सेफ्टी चाक लावून पळण्याच्या वयात, पायाला चाक बांधून सुवर्ण पदक जिंकण्याचा चंगच जणू या पाच वर्षीय तनिष्काने बांधलाय. तीने गत वर्षभरात नऊ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

भुसावळ : येथील मध्ये रेल्वे संस्कृती प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी तनिष्का अजिंक्य मेहेत्रे हिची आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड झाली. जेमतेम पाच वर्ष असताना सायकलला सेफ्टी चाक लावून पळण्याच्या वयात, पायाला चाक बांधून सुवर्ण पदक जिंकण्याचा चंगच जणू या पाच वर्षीय तनिष्काने बांधलाय. तीने गत वर्षभरात नऊ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

तनिष्का मेहेत्रे हिने नूतन वर्ष २०२० ची दमदार सुरुवात करत, यशाची आणि सुवर्णपदकांची मालिका सुरू केली. १२ जानेवारीला जळगाव स्पोर्टस द्वारा आयोजित जिल्हा स्केटिंग स्पर्धेत बिगीनर स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. यानंतर तिची निवड गोवा स्केटिंग फेस्टिवल स्पर्धेसाठी झाली. या अगोदर जानेवारीत गोवा येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत कनिष्काने ३०० व ५०० मीटर मध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली. नाशिक येथे ओपन रोलर स्केटिंग स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच गत वर्षात राज्यस्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप, मलकापूर येथील स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. गोवा येथे झालेल्या स्पर्धेत दोन सुवर्णपदके, मानचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडीचे प्रमाणपत्रावर झेप घेत उपस्थितांची वाहवा मिळवली. तर आता थायलंड येथे १५ ते २० फेब्रुवारी तसेच मलेशिया येथे २८ एप्रिल ते २ मे दरम्यान, होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ओपन रोलर स्पोर्ट्स प्रमोशनल टूर्नामेंट स्केटिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

नक्की पहा : आहो हे काय..."हग डे' ला पोलिसांनी मारली मिठी...! 
 

कडाक्याच्या थंडीत सराव
तनिष्का हिची यशस्वी वाटचाल सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. कडाक्याच्या थंडीत लवकर उठून शाळेतील अभ्यास व इतर उपक्रमात सतत बाजी मारत जिंकण्याचे आव्हान तिने लीलया पेलले आहे. रेल्वे प्रशासनातर्फे तनिष्का व तिची आई मीनाक्षी मेहेत्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तनिष्का ही रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागातील साहेबराव माळी यांची नात आहे. तिला अमर लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhusawal marathi news five year cildren scatin pliyers Nine gold medals