रेल्वे विभागाला ‘अल्झायमर’ची लागण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

दिरंगाई बाबत जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात रेल्वे विभागाचे वय ६० वर्षे दर्शवून त्यांच्या विसरभोळेपणाचा उल्लेख करून केसपेपर काढला असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अल्‍झायमर (स्मृतिभंग) गंभीर आजार असल्याचे निदान केले होते.

भुसावळ : जळगाव येथील शिवाजीनगरातील जीर्ण झालेले रेल्वे उड्डाणपूल, सुरत रेल्वे गेट ते भोईटे नगर मालधक्का आदी विषयांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने भुसावळ रेल्वे विभागाला ‘अल्झायमर’ नावाचा गंभीर आजार झाल्याचा आरोप करून जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता, अमित पिसाळ, श्रीकांत एरंडे, राजेंद्र पिसाळ, विलास सांगोरे, शेख इकबाल यांनी एडिआरएम मनोज सिन्हा यांना मागण्यांचे निवेदन व नारळ दिले.

हेपण पहा - न बोलताच जुळली मनं...दिव्यांग मुलीला बनविले जीवनसाथी 

जळगाव येथील शिवाजीनगर रेल्वे पुल रेल्वे प्रशासनाने पाडला. मात्र, उड्डाणपुलाचे काम होत नसल्याने गुप्ता यांनी रेलरोको आंदोलन केले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ममुराबाद लेंडी नाल्याचा पूल व सुरत रेल्वे गेट ते भोईटे नगर मालधक्का मार्गे रेल्वे हद्दीतील रस्ता उपलब्ध करून दिला. मात्र, मालधक्का रस्ता भागात खड्डे पडल्याने दुरुस्तीची मागणी केली होती. हा रस्ता १५ मे २०१९ पर्यंत दुरुस्त करण्याचे आश्वासन रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता दीपक कुमार यांनी दिले होते. मनपा आयुक्तांना विनंती केल्यावर त्यांनी रेल्वेला पत्रही दिले होते व गुप्ता यांचा पाठपुरावा सुरू होता. रेल्वे अभियंता दीपककुमार यांच्या दिरंगाई बाबत जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात रेल्वे विभागाचे वय ६० वर्षे दर्शवून त्यांच्या विसरभोळेपणाचा उल्लेख करून केसपेपर काढला असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अल्‍झायमर (स्मृतिभंग) गंभीर आजार असल्याचे निदान केले होते.

या आहेत मागण्या
ममुराबाद रेल्वे पुलाखालील स्लॅब तोकडा असून, त्यातून मलमूत्र युक्त पाणी खाली पडते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. म्हणून तातडीने उपाययोजना करावी, रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ५ वरील पादचारी पुलाचा बंद केलेला जीना त्वरित सुरू करावा, भोईटे नगर रेल्वे मालधक्का रस्त्याची दुरुस्ती करावी, ब्राह्मण संघा जवळील भुयारी मार्ग त्वरित बांधण्यात यावा आदी मागण्यांसाठी चर्चा करून निवेदनही देण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhusawal railway department alzheimer jalgoan shivaji nagar brige work