
पोल्ट्री फार्मचे अंडी, चिकन, पक्षी, पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
नवापूर : पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू ‘राणीखेत’ या आजाराने नसून ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याची पुष्टी शनिवारी सायंकाळी प्रशासनाने दिली. आलेल्या अहवालाने नागरिकांच्या मनात धडकी भरली असून, कुक्कुटपालन व्यवसायावर संकट आले आहे. नवापूर तालुक्यासह नंदुरबार, धुळे, अकोला, बुलढाणा, नगर या जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याचा अहवाल आज सायंकाळी आल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. नवापूर तालुक्यात चार दिवसांत अकरा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
आवश्य वाचा- बारिपाडा येथे दोन कोटींचा सामंजस्य करार
नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने होत असल्याने प्रशासनाने डायमंड, परवेज पठाण, आमलिवाला वसीमसह इतर पोल्ट्री फार्मच्या चौदा पक्षांचे नमुने पुणे व भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते. हा अहवाल शनिवारी (ता. ६) सायंकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती महसूल विभागाने दिली. नवापूर तालुक्यातील २६ पोल्ट्री फार्म मध्ये साधारण नऊ लाख पक्षी आहेत. या सर्व पक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पक्षांचे खाद्य मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यावसायिकांनी साठवून ठेवले असते त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी लागेल. सर्वच पोल्ट्री फार्मवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्मचे अंडी, चिकन, पक्षी, पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. नवापूर शहरातील बर्ड फ्लू नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाचे नाशिक, नगर, धुळे, जळगाव आदी ठिकाणाहून शंभर पथकांना पाचारण करण्यात आले आहे.
प्रशासन सज्ज
‘बर्ड फ्लू’ संदर्भात २००६ ची परिस्थितीचे अनुभव लक्षात घेता प्रशासन कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाही. पक्षांचे किलिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त करण्यासाठी ६० पोलिस कर्मचारी व वीस महिला कर्मचाऱ्यांना पाचारण केले आहे. सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोंबड्यांच्या वाहतुकीसाठी सीमाबंदी होण्याची शक्यता आहे.
आवश्य वाचा- भुसावळ विभागाला तिसऱ्या, चौथ्या रेल्वेमार्गासाठी ६०० कोटींची तरतूद
चार दिवसात ११ हजार कोंबड्यांचा मृत्यू
पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्या तोंडी आदेशाने पालिका प्रशासनाने शहरातील ४५ दुकानदारांना चिकन व अंडी विक्रीला मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी नवापूर शहरातील एक किलोमीटर परिघातील २२ कुक्कुटपालन पालन व्यवसायाला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सील करण्याचे आदेश केले होते. त्याअनुषंगाने तहसीलदार मंदार कुलकर्णी व त्यांचे पथकाने पोल्ट्री फार्मला सील केले. नवापूर तालुक्यात चार दिवसांत अकरा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे