उन्मेष पाटलांच्या विजयाने दरेगावात दिवाळीची अनुभूती 

jalgaon
jalgaon

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आमदार उन्मेष पाटील यांच्या विजयाबद्दल त्यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. मतमोजणी सुरू असताना जसजशी मतांची आघाडी उन्मेष पाटलांना मिळत होती, तसतसे दरेगावचे ग्रामस्थ फटाके वाजवून आनंद व्यक्त करीत होते. त्यामुळे दरेगावात आज दिवाळीचाच अनुभव जणू ग्रामस्थांना आला. 

चाळीसगाव शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील दरेगाव (ता. चाळीसगाव) येथे आज सकाळी आठपासून घराघरात टीव्ही समोर बसून निवडणुकीचे निकाल ग्रामस्थ ऐकत होते. सकाळी अकराला उन्मेष पाटील आघाडीवर असल्याचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी गावाबाहेरील चौकात येऊन गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. यावेळी विजयाच्या घोषणा देण्यात आल्याने परिसर दणाणला होता. दुपारी रणरणते ऊन असतानाही ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे दिसून येत होते. उन्मेष पाटलांच्या रूपाने दरेगावला सुरवातीला आमदारकी व आता खासदारकी प्राप्त झाली आहे. त्यामुळे गावाला लालदिव्याची गाडी लाभावी, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांची आहे. सायंकाळी आमदार उन्मेष पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांची गावातून मिरवणूक काढण्याचे नियोजन गावातील तरुणांनी केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या निकालाची माहिती काही जण थेट जळगावहून भ्रमणध्वनीवरून घेत होते. गावात झालेल्या आजच्या जल्लोषात वयोवृद्ध ग्रामस्थही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. गावातील आनंदाचे वातावरण पाहता, आज दरेगावला जणू यात्रेचे स्वरूप आले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. काहींनी गावात पेढे वाटून आनंद साजरा केला. 

गावाच्या लौकिकात पडली भर 
सोनाली महाजन (सरपंच ः दरेगाव) ः आमच्या छोट्या गावाचा व्यक्ती अगोदर आमदार आणि आता खासदार झाल्याने गावाच्या लौकिकात भर पडली आहे. उन्मेष पाटील यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आम्ही मोठा उत्सव साजरा केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गावातर्फे खूप खूप शुभेच्छा. 

भविष्यात उंच शिखर गाठावे 
गिरीश पाटील (उपसरपंच ः दरेगाव) :- उन्मेष पाटलांच्या विजयाची आम्हाला सुरवातीपासूनच खात्री होती. त्यासाठी जल्लोष करण्यासंदर्भात आम्ही रात्रीपासूनच तयारी केलेली होती. ते निवडून आल्याने गावासोबतच तालुका व तालुक्‍यासोबतच जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी भविष्यात उंच शिखर गाठावे हीच आमच्या गावाची अपेक्षा आहे. 

मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी 
साहेबराव महाजन (माजी सरपंच ः दरेगाव) : आमच्या गावाची शान असलेल्या उन्मेष पाटलांनी आतापर्यंत सर्वांना सोबत घेऊनच विकासकामे केली आहेत. या यशामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल अशी आम्हा सर्वांना आशा आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याने त्याचाही दरेगावकरांना सार्थ अभिमान आहे. 

जिल्हा सुजलाम सुफलाम्‌ होईल 
दयाराम राठोड (ग्रामस्थ, दरेगाव): पाडळसे धरण, नारपार योजना त्याचबरोबर वरखेडे- लोंढे बॅंरेज प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. उन्मेष पाटील यांच्या विजयामुळे जिल्ह्यात जलक्रांती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम्‌ झाल्याशिवाय राहणार नाही. 

जास्तीत जास्त विकासकामे व्हावीत 
सुनंदाबाई सोनवणे (गृहिणी ः दरेगाव) : आम्ही आज सकाळी सातपासूनच सहकुटुंब टीव्हीवर निवडणुकीचे निकाल ऐकत होते. सकाळी अकराला उन्मेष पाटलांनी घेतलेली मतांची आघाडी पाहिली आणि घरातच एकच जल्लोष सर्वांनी केला. त्यांच्या हातातून जास्तीत जास्त विकासाची कामे व्हावीत, हीच शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com