esakal | शिवसेनेत गेलेल्या अब्दुल सत्तारांना भाजपचा पहिला दणका
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेत गेलेल्या अब्दुल सत्तारांना भाजपचा पहिला दणका

कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करून चोवीस तास उलटत नाही तोच मतदारसंघातील भाजपने त्यांना पहिला धक्का दिला आहे.

शिवसेनेत गेलेल्या अब्दुल सत्तारांना भाजपचा पहिला दणका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोयगाव : काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करून चोवीस तास उलटत नाही तोच मतदारसंघातील भाजपने त्यांना पहिला धक्का दिला आहे. सोयगाव नगर पंचायतीतील शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रतिभा बोडखे यांच्याविरोधात इतर सदस्यांच्या मदतीने भाजपने आणलेला अविश्‍वास ठराव 13 विरुध्द शून्य मतांनी मंजूर करण्यात आला आहे.

नगरपंचयतीमध्ये भाजपशी युती असताना शिवसेनेने काँग्रसेच्या पाठिंब्यावर अध्यक्षपद मिळवले होते. अब्दुल सत्तार यांची आपल्या मतदारसंघावर मजबूत पकड असल्याचे आतापर्यंत अनेकवेळा सिध्द झाले आहे. अगदी कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्‍वास ठराव आणून आपला समर्थक सभापतिपदी बसवला होता. तालुक्‍यात अब्दुल सत्तार यांचा शब्द प्रमाण मानला जातो. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर शिवबंधन बांधून घेत तालुक्‍याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला. पण आता ज्या भाजपच्या स्थानिक नेत्या पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांना विरोध दर्शवला होता. त्यांच्याकडून देखील सत्तार यांना छोटे-मोठे धक्के देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, याचा प्रत्यय सोयगाव नगरपंचायतीतील शिवसेना नगराध्यक्षांच्या विरोधातील अविश्‍वास ठरावावरून आला आहे. 

2015 मध्ये झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत सोयगांवमध्ये शिवसेना-भाजप युती होती. दोघांनीही अडीच-अडीच वर्ष अध्यक्षपद भूषवायचे असा फॉर्म्युला ठरला होता. पहिल्या टर्मला भाजपचे कैलास काळे हे अध्यक्ष झाले होते. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना आणि कॉंग्रेस असे समीकरण उदयाला आले आणि त्याचे पडसाद इकडे सोयगांव नगरपंचायतीत देखील उमटले. 

शिवसेनेने भाजपची साथ सोडत सत्तार समर्थक कॉंग्रेस सदस्यांचा पाठिंबा घेत प्रतिभा बोडखे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती. भाजपला हा दगाफटका सहन न झाल्यामुळे आणि बोडखे यांच्या पतीराजांची लुडबूड असह्य झाल्यामुळे भाजपने अध्यक्षांविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली होती. सात-आठ महिन्यांपासून रेंगाळलेल्या या प्रक्रियेला सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे अचानक वेग आला. अखेर सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुर्हूत साधत स्थानिक भाजप नेत्यांनी सत्तार यांना या निमित्ताने दणका दिला. 

सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने नाराज झालेल्या तीन व कॉंग्रेसच्या एक सदस्यांच्या सोबतीने भाजपच्या नऊ नगरसेवकांनी अध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणला होता. आज त्यावर सुनावणी होऊन तो 13 विरुध्द शून्य मतांनी मंजूर करण्यात आला.

शिवसेना व कॉंग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य गैरहजर राहिले. येत्या दहा दिवसांत नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्‍यता असून, भाजप या पदावर कोणाची वर्णी लावणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top