धुळ्यात इंधन, वीजप्रश्‍नी सेना- भाजप आमनेसामेने 

निखील सुर्यवंशी
Saturday, 6 February 2021

कोरोनाच्या संकटकाळातील वाढीव वीजबिले कमी न करता उलट कंपनीकडून ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठविल्या

धुळे ः राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेना आणि विरोधक भाजप येथे शुक्रवारी दोन स्वतंत्र आंदोलनांव्दारे आमनेसामने आल्याचे दिसले. शिवसेनेने इंधन, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात केंद्रातील मोदी सरकारवर निशाना साधला, तर भाजपने वाढीव वीज बिलांबाबत महाआघाडी सरकारवर आरोपांव्दारे शरसंधान साधले. शिवसेना आणि भाजपच्या परस्परविरोधी घोषणांमुळे शहर दणाणले. 

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे महागाईचा आगडोंब उसळत आहे. या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकारविरोधात आग्रा रोडवरून बैलगाडी मोर्चा काढल्याचे शिवसेनेने सांगितले. याप्रश्‍नी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आंदोलन झाले. बैलगाड्यांवर दुचाकी ठेवून आणि अग्रभागी दुचाकी ढकलून नेत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. इंधन आणि सिलिंडरच्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत आहे. पर्यायाने महागाई गगनाला भिडली आहे. त्यात सर्वसामान्य होरपळत असून मोदी सरकारने केवळ अच्छे दिनचे गाजर दाखवून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढल्याचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी सांगितले. त्यांच्यासह सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, राजेंद्र पाटील, किरण जोंधळे, डॉ. सुशील महाजन, अॅड. पंकज गोरे, गुलाब माळी, मनोज मोरे, संजय वाल्हे, रवी काकड, राजेश पटवारी, संगीता जोशी, अरुणा मोरे, सुनिता वाघ, शेखर वाघ, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, नंदलाल फुलपगारे, देवा लोणारी, एजाज हाजी, पुरुषोत्तम जाधव, देवराम माळी, राज माळी, हरीश माळी, आबा भडागे, संजय जगताप, हरीश माळी, रामदास कानकाटे, भटू गवळी आदी मोर्चात सहभागी झाले. 

वीज कार्यालयास कुलूप 
कोरोनाच्या संकटकाळातील वाढीव वीजबिले कमी न करता उलट कंपनीकडून ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा पाठविल्या जात आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ भाजपने येथील साक्री रोडवरील वीज कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले. ग्राहकांना दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्या, त्यांचा छळ बंद करावा, अशी मागणी भाजपने केली. सामान्यांच्या खिशात खडखडाट, ठाकरे सरकारच्या वीजबिलांचा गडगडाट, ठाकरे सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. त्यांनी मागण्यांचे निवेदन वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले. सवलत न देता अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारली गेली. यातून ठाकरे सरकारने जनतेचा विश्वासघात केला. त्यात नोटिसा देऊन पठाणी वसुली केली जात आहे. हा प्रकार हाणून पाडू असे, असा इशारा महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, यशवंत येवलेकर, भिकन वराडे, ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, प्रा. सागर चौधरी, प्रदीप कर्पे, सचिन शेवतकर, दिनेश बागूल, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा मायादेवी परदेशी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, निशा चौबे, अमृता पाटील, मोतिक शिंपी, निर्मला कार्ले, सुरेखा राणा, संध्या चौधरी, शिला राणा, मिना चौधरी, वंदना बारी, भारती पवार, कशिश उदासी, मोहिनी गौड आदींनी दिला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp shivsena marathi news dhule fuel power issues shive sena bjp face face