नाशिक मध्य : भाजप महायुतीला गड राखण्यात यश | Election Results 2019

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 24 October 2019

बहुजन व मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला; परंतु विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजयाकडे आगेकूच कायम ठेवली. सोबतच भाजपच्या वाट्यातील नाशिक मध्यचा गड राखण्यात यश मिळविल्याचे जवळजवळ निश्‍चित आहे

नाशिक : बहुजन व मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात आघाडीतर्फे कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला; परंतु विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या फेरीपासून आघाडी घेत विजयाकडे आगेकूच कायम ठेवली. सोबतच भाजपच्या वाट्यातील नाशिक मध्यचा गड राखण्यात यश मिळविल्याचे जवळजवळ निश्‍चित आहे. तिरंगी झालेल्या लढतीत बाराव्या फेरीअखेर भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे यांना 38 हजार 738, कॉंग्रेसच्या डॉ. पाटील यांना 27 हजार 458, तर मनसेचे नितीन भोसले यांना 13 हजार 216 मते मिळाली होती. 

देवयानी फरांदेंनी पहिल्या फेरीपासून आघाडी राखत विजय निश्‍चित केला

सन 2014 च्या निवडणुकीत मनसेचे तत्कालीन आमदार वसंत गिते यांचा पराभव करत प्रा. फरांदे यांनी यश मिळविले होते. या निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादीसोबत मित्रपक्ष शिवसेनेचेदेखील आव्हान पेलत फरांदे यांनी आमदार म्हणून यश मिळविले होते. या वेळच्या निवडणुकीत प्रामुख्याने आघाडीतर्फे कॉंग्रेसचे, तसेच एकेकाळी मतदारसंघात प्रभाव असलेल्या मनसेचे आव्हान असेल, अशी चर्चा मतदारांत रंगली होती. गेल्या सोमवारी (ता. 21) मतदानाच्या दिवशीदेखील तसेच वातावरण होते. काही भागात कॉंग्रेसला, तर काही भागात मनसेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा होती. मात्र, गुरुवारी (ता. 24) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सुरू असलेल्या मतमोजणी प्रक्रियेत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी राखत जवळजवळ आपला विजय निश्‍चित केला आहे. बारावी फेरीअखेर फरांदे यांनी 11 हजार 280 मतांची आघाडी घेतली होती. बाराव्या फेरीअखेर देवयानी फरांदे (भाजप) 38,738 मते मिळविली होती. डॉ. हेमलता पाटील (कॉंग्रेस) 27,458 मतांसह दुसऱ्या, तर नितीन भोसले (मनसे) 13,216 मतांसह तिसऱ्या स्थानी होते. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेकरिता सभागृह परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना लांबूनच ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने निकाल ऐकून समाधान मानावे लागले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP wins Mahayuti stronghold in nashik central