गोठावणाऱ्या थंडीत गरजू विद्यार्थिनींना दिली मायेची ऊब!

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

गरजू विद्यार्थिनींमध्ये अरुणा मानवर, ज्योती मानवर, शीतल मगरे, नंदिनी कोकणी, वैशाली पवार, सुनीता गोयकर, रविना पवार, अनुसया गोयकर, रुपाली माळचे, लक्ष्मी माळचे आदी पहिली ते पाचवीच्या लाभार्थी विद्यार्थिनींचा समावेश आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड.शरदचंद्र शाह यांनी आपल्या दातृत्वातून माळमाथा परिसरातील विविध शाळांतील सुमारे 200 गरजू व गोरगरीब विद्यार्थीनींना कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर शालवाटप करून मायेची ऊब दिली. ऍड.शाह यांनी माळमाथा परिसरातील जवळपास 10 ते 15 शाळांतील गरजू विद्यार्थिनींना शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधींमार्फत आजपर्यंत सुमारे 200 शालींचे मोफत वितरण केले.

ऍड. शहांतर्फे वाजदरे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरजू विद्यार्थिनींना नुकतेच आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रा.भगवान जगदाळे, कर्मचारी पुंडलिक नामदास, वाजदरेच्या सरपंच सुमनबाई सोनकर, पदोन्नती मुख्याध्यापक राजेंद्र देसले, एकनाथ पिसाळ आदींसह शिक्षक व ग्रामस्थांच्या हस्ते प्रातिनिधिक शालवाटप करण्यात आले. ऍड.शहांच्या या दातृत्वाचे व उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

गरजू विद्यार्थिनींमध्ये अरुणा मानवर, ज्योती मानवर, शीतल मगरे, नंदिनी कोकणी, वैशाली पवार, सुनीता गोयकर, रविना पवार, अनुसया गोयकर, रुपाली माळचे, लक्ष्मी माळचे आदी पहिली ते पाचवीच्या लाभार्थी विद्यार्थिनींचा समावेश आहे. यावेळी मुख्याध्यापक देसले यांच्यासह भगवान जगदाळे यांनी ऍड.शहांतर्फे प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. शिक्षक पावबा बच्छाव यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले व आभार मानले. शिक्षक बंडू मोरे, सावता बोरसे, इंद्रसिंग चौरे, पावबा बच्छाव, बाई पवार, आफ्रिन पठाण आदींनी संयोजन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: blanket distribute on poor students in Dhule