वराच्या हातावर तुरी देत नियोजित वधू फरारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

कसमादे परिसरातील दुष्काळी स्थिती नववधूंसाठी पालकांचा नोकरदाराकडे असलेला कलमुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुणांचे विवाह होणे अवघड झाले आहे. नववधूच्या शोधासाठी सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड यांसह नंदुरबारच्या आदिवासी पट्ट्यात युवकांनी मोर्चा वळविला आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत.

मालेगाव  - कसमादे परिसरातील दुष्काळी स्थिती नववधूंसाठी पालकांचा नोकरदाराकडे असलेला कलमुळे शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुणांचे विवाह होणे अवघड झाले आहे. नववधूच्या शोधासाठी सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड यांसह नंदुरबारच्या आदिवासी पट्ट्यात युवकांनी मोर्चा वळविला आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. 

गारेगाव (ता. मालेगाव) येथील मन्साराम देसले (वय ३५) यांची अशाच प्रकारे फसवणूक झाली. नियोजित वधूसह दोघांनी त्याला एक लाख ७५ हजारांची रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख ९३ हजार रुपयांना गंडा घालून नियोजित वधू फरारी झाली. मन्सारामचा विवाह होत नसल्याने त्याने उषा मुसळे (रा. धनपिंपरी, ता. अंबड, जि. जालना) व निवृत्ती भामरे (रा. खिरमाणी, ता. सटाणा) या मध्यस्थांमार्फत वधू शोधली. दोघांनी त्याला आशा गायकवाड (रा. धनपिंपरी, जि. जालना) हिच्याशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखविले. नंतर गारेगाव येथे ३ मेस नियोजित वधूसह तिघांनी भेट दिली. मन्सारामकडून रोख एक लाख ७५ हजार रुपये, पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण व जोडवे घेतले. नंतर त्याला तुमचा विवाह औरंगाबाद येथील कोर्टात करून देतो, असे सांगून ७ मेस औरंगाबादला बोलाविले. औरंगाबाद येथे तिघांची भेट झाल्यानंतर नियोजित वधूसह दोघींनी वॉशरुमला जाऊन येतो, असे सांगून पलायन केले. नियोजित वर प्रतीक्षा करून माघारी आला. मध्यस्थ निवृत्ती भामरे याच्याशी संपर्क साधला असता, त्यानेही ताकास तूर लागू दिला नाही.

अखेर मंगळवारी रात्री मन्सारामने वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मन्सारामच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिसांनी मध्यस्थ उषा मुसळे, निवृत्ती भामरे व नियोजित वधू आशा गायकवाड यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्‍वासघात व ठकबाजी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. कसमादे परिसरात यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी फसवणूक होऊनही तक्रारी झाल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bride fugitive Crime