धुळे- कुठे आठ ते बारा दिवसांतून, कुठे पंधरा दिवसांतून; तर कुठे आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा होतो. शिवाय, काही ठिकाणी पाइपलाइन आहे; पण पाण्याचे स्रोतच नसल्याने नळांना पाणीच नाही. कुठे तुटलेली पाइपलाइन; तर कुठे कोरडेठाक नळ ही स्थिती अकार्यक्षम व्यवस्थेचा जिवंत पुरावा आहे, असे म्हणत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत धुळे लोकसभा मतदारसंघातील कामांचे लोकसभेत वाभाडे काढले. याबाबत तालुकानिहाय सखोल चौकशी करावी, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.