योजनांच्या लाभासाठी गावागावात शिबिर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

शहादा : सक्षम ग्रामसभा हे लोकशाहीचे महत्वाचे अंग आहे. यासाठी जातीचे व उत्पन्नाचे दाखले व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खेडेगावात शिबिरे घेतले जातील असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले.

शहादा : सक्षम ग्रामसभा हे लोकशाहीचे महत्वाचे अंग आहे. यासाठी जातीचे व उत्पन्नाचे दाखले व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खेडेगावात शिबिरे घेतले जातील असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले.

लोकशाही उत्सवाच्या समारोपासाठी विचारधारा फाऊंडेशनतर्फे पाडळदा (ता. शहादा) येथे आदिवासी मेळावा झाला, त्यावेळी अध्यस्थानावरून डॉ. गिरासे बोलत होते. शिक्षण विस्तार अधिकारी डी. टी. वळवी, आदिवासी लेखक व विचारवंत वाहरू सोनवणे, भिमसिंग पवार, ठगीबाई वसावे आदी उपस्थित होते. दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, संघटना, व्यक्ती तसेच लेखक, विचारवंत व पत्रकार मिळून राज्यभर २६ ते ३० जानेवारी या काळात लोकशाही उत्सव साजरा करण्यात येतो, मागील तीन वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातही हा उत्सव साजरा केला जात आहे.

शहाद्यात १०, ११ ला होणार प्लेसमेंट सेल!

तीस गावांत उत्सव साजरा

विचारधारा फाऊंडेशनतर्फे शहादा तालुक्यातील तीस गावांत सहा दिवस अभियान राबवून लोकशाही उत्सव साजरा झाला. ग्रामसभेचे नियम व लोकांचे अधिकार आणि गावाच्या विकासात ग्रामसभेची भूमिका इत्यादी मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली गेली. कॉर्नर बैठका, शालेय विद्यार्थ्यांच्या रँली, गाणी, घोषवाक्ये व पत्रके इत्यादी माध्यमांतून लोकप्रबोधन करण्यात आले.

श्री. वळवी यांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांची मांडणी करून शिक्षण हक्क कायद्याबद्दल माहिती दिली. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याबाबत लोकांना आवाहन केले. कवी वाहरू सोनवणे यांनी आदिवासी संस्कृतीमधील लोकशाही मूल्य या विषयावर मांडणी केली.

प्रास्ताविक व लोकशाही उत्सवाची भूमिका विचारधारा फाऊंडेशनचे संचालक तात्याजी पवार यांनी मांडली. मंडळ अधिकारी पाटील, तलाठी प्रियंका पाटील, पोलिस पाटील राजश्री भील, शिक्षक भोई, श्री. जायभाय तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच पाडळदा, भागापूर, कवळीथ, सोनवल, टूकी, गोगापूर, बडवी, गोदीपूर, कर्जोत, भोरटेक, चिखली, ओझर्टा व न्यू. असलोद आदी गावांतील सुमारे तीनशे महिला पुरुष उपस्थित होते.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विलास अहिरे, रवींद्र ठाकरे, दिनेश ठाकरे, दिनेश वाघ, नारायण पवार, मेघराज भील, शरद पवार, गोपाल ठाकरे, सुक्राम पवार यांनी परिश्रम घेतले. प्रत्येक गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा व ग्रामपंचायतींचे सहकार्य लाभले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Camp in the village for the benefit of the schemes, Dr Girase