अर्थसंकल्पात मंजूर कामे थांबविण्याची सरकारवर नामुष्की : छगन भुजबळ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 November 2019

गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य दिवाळखोरीकडे नेऊन ठेवल्याने अर्थव्यवस्था धोक्‍यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये मंजूर कामे थांबविण्याची वेळ सरकारवर आली आहे, असे टीकास्त्र नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता. 14) सोडले

नाशिक :  भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य दिवाळखोरीकडे नेऊन ठेवल्याने अर्थव्यवस्था धोक्‍यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये मंजूर कामे थांबविण्याची वेळ सरकारवर आली आहे, असे टीकास्त्र राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता. 14) सोडले. 

मंजूर कामे अन्‌ प्राप्त निधी यात तफावत

राज्याचे रस्ते सचिव चंद्रशेखर जोशी यांनी नव्याने हाती घेतलेली अथवा अर्थसंकल्पीय पुस्तकातील कामांचे कार्यारंभ आदेश दिले नाही. अशा कामांचे कार्यारंभ आदेश 31 मार्च 2020 पर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकामचे मुख्य आणि अधीक्षक अभियंता यांना गुरुवारी दिले. रस्ते आणि पुलांची, परिरक्षण व दुरुस्तीची मंजूर कामे अन्‌ प्राप्त निधी यात तफावत असल्याचे सचिवांनी पत्रात मान्य केले. तसेच 2019-20 मधील उपलब्ध निधीवर ताण कमी व्हावा आणि सुरू असलेल्या कामांपैकी काही कामांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी हे धोरण स्वीकारण्यात येत असल्याचे सचिवांचे म्हणणे आहे. आशियाई बॅंक सहाय्यित व हायब्रिड ऍन्युइटी योजनेंतर्गतच्या कामांना हे धोरण लागू होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भुजबळांनी यापूर्वीच्या सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले आहेत. 

खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये मोठी वाढ 
राज्यातील रस्त्यांच्या प्रश्‍नांमुळे जनता हवालदिल झाली आहे. रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक रस्त्यांमध्ये खड्डे मावत नाहीत. चालकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. असे असताना अर्थसंकल्पात मंजूर रस्त्यांची कामे थांबवण्याची नामुष्की राज्यावर ओढवली. ही बाब चिंताजनक आणि गंभीर आहे. -छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chagan bhujbal statement on bjp Nashik News