चाळीसगाव- जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याची उपलब्धता कशी होऊ शकते, याचा प्रत्यय ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) परिसरातील कामांमधून दिसून येत आहे. सन २०२० मध्ये कोरोनाची बिकट परिस्थिती असताना येथील शेतकऱ्यांनी ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ मोहीम हाती घेतली. यासाठी येथील रोटरी क्लबसह सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पोकलॅनमध्ये लोकसहभागातून डिझेल टाकून तब्बल ५६ दिवस कामे करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम सध्याच्या रणरणत्या उन्हात दिसून येत आहे. या भागातील नाल्यांमध्ये साचलेले पाणी या कामाचा परिणाम असल्याचे फलित आहे.