आरोप करणारे स्वतःसाठी खड्डे खोदतात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Eknath Shinde criticize uddhav thackearay politics nandurbar

आरोप करणारे स्वतःसाठी खड्डे खोदतात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदुरबार : ‘‘शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याचे पोटशूळ काहींना उठते. त्यामुळे आरोप करून बदनाम करीत आहेत. तुमचे आरोप जनतेला माहीत आहेत. त्यामुळे तुमच्या आरोपांना जनता भीक घालत नाही. उलट जनता माझ्या पाठीशी आहे. आरोप करणारे आरोप करून स्वतःसाठीच खड्डे खोदत आहेत. त्या आरोपांना मी कामांच्या माध्यमातून उत्तर देईन. चांगले काम करणाऱ्यांना चांगले म्हणण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे,’’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता शाब्दिक वार केले.

पालिकेच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्यानंतर जी. टी. पाटील महाविद्यालयाचा प्रांगणात बाळासाहेबांची शिवसेना गटाचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘काहीजण आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र आम्ही नव्हे तर गद्दारी तुम्ही केली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. निवडणुकीचा वेळी शिवसेना- भाजप युती म्हणून बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे लावून मते मागितली. निकाल हाती येताच दुसऱ्यांसोबत सत्ता स्थापन केली. याला काय म्हणावे. यामुळे जनतेचा मनात व आमदारांचा मनात राग खदखदत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला. आज जनतेचा मनातले आपले सरकार स्थापन झाले आहे. मी तुमचा आहे. तुमच्या अपेक्षा, तुमच्या विकासासाठी मी झटणार आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी ५० खोके सर्व ओके बाजूला केले माजलेले बोके असे म्हणत ठाकरेंवर संधान साधले. ‘‘ज्यांना ४० आमदार गेले तरीही कळू नये, तर किती गंभीर आहे. कोणी काहीही म्हणू द्या, रिक्षावाला, टपरीवाला, बॅंडवाल्याचे सरकार आहे. म्हणजे सर्वसामान्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री अत्यंत साधे आहेत. त्यांना जनतेचे काम करणे आवडते. आमच्यावर गद्दारीचा आरोप करतात. पण ज्या शिवसेनेवर तुम्ही मोठे झाले ती शिवसेना आम्ही मोठी केली आहे, असा समाचार पाटील यांनी ठाकरे कुटुंबीयांचे नाव न घेता घेतला.

अब्दुल सत्तार यांचे आव्हान

‘‘मुंबईतील पप्पू क्रमांक दोन याने प्रथम राजीनामा द्यावा, मग मी देतो आणि होऊन जाऊ द्या निवडणूक. सिल्लोडमध्ये जल्लोष होतो की मुंबईमध्ये,’’ असे आव्हान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांना दिले.