Dhule News : जिल्हाधिकारी कार्यालयातच आता मुख्यमंत्री सचिवालय कक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Zilla Parishad

Dhule News : जिल्हाधिकारी कार्यालयातच आता मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

धुळे : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे, त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (Chief Minister secretariat room is now in collector office dhule news)

त्यामुळे आता नागरिकांना आपली निवेदने व अर्ज थेट या कक्षात देता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू झाला आहे. हा कक्ष कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे.

२२ डिसेंबरपासून कक्षाचे कामकाज सुरू असून, आतापर्यंत कक्षात १४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील नऊ अर्जांवर कार्यवाही करण्यात आली असून, प्रलंबित पाच अर्जांपैकी एक अर्ज मुख्यमंत्री सचिवालयस्तरावर पाठविण्यात आला आहे. इतर अर्जावर कार्यवाही सुरू आहे. ज्या अर्जावर शासनस्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

तसेच काही अर्ज, निवेदने शासनाच्या धोरणात्मक बाबींशी निगडित असतात अशी निवेदने त्या स्तरावरून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (मुंबई) यांच्याकडे पाठविण्यात येतात. मात्र, जे जिल्हास्तरावरील किंवा उपविभाग, तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांशी संबंधित अर्ज आहेत ते संबंधित विभागाच्या जिल्ह्याच्या कार्यालयप्रमुखांकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे.

कार्यवाहीनंतर संबंधित विभाग अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणार आहे. त्याची प्रत कक्षास पाठविणार आहे. या कक्षासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड, नायब तहसीलदार, एक लिपिक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले.

नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालय व शासनस्तरावर असलेली कामे व त्या संदर्भातील अर्ज, निवेदने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे लेखी स्वरूपात द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी या वेळी केले.