MPSC New Syllabus : अभियांत्रिकी, वन, कृषीसाठी नवीन अभ्यासक्रम; 2023 पासूनच लागू करण्याची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSC New Syllabus : अभियांत्रिकी, वन, कृषीसाठी नवीन अभ्यासक्रम; 2023 पासूनच लागू करण्याची तयारी

नाशिक : राज्‍य सेवा परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीला विरोध झालेला असताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्‍य काही परीक्षांसाठी नवीन शिक्षणक्रम जारी केलेला आहे.

अभियांत्रिकी, वन आणि कृषी सेवा मुख्य परीक्षांसाठी २०२३ पासूनच नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्‍याचे परिपत्रक आयोगाने जारी केले आहे. या निर्णयाचे पडसाद उमेदवारांमध्ये उमटू लागले आहेत. (MPSC New Syllabus for Engineering Forest Agriculture Preparation to implement from 2023 itself nashik news)

राज्‍य सेवा परीक्षांसाठी वर्णनात्‍मक स्वरूपाचा नवीन अभ्यासक्रम लागू करत असल्‍याचे आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्‍यास राज्‍यभरातील उमेदवारांचा विरोध झाला होता. अनेक ठिकाणी आंदोलनेदेखील झाली.

आता त्‍यापाठोपाठ अन्‍य काही परीक्षांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करत असल्‍याचे आयोगाने परिपत्रक जारी केले आहे. त्‍यामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये सध्या हा चर्चेचा विषय झालेला आहे.

आयोगाने जारी केलेल्‍या परिपत्रकानुसार महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य, महाराष्ट्र वन सेवा मुख्य आणि महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू केलेला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्‍त परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या परीक्षांचे अभ्यासक्रम संकेतस्‍थळावर प्रसिद्ध केला आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (स्‍थापत्‍य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी) आणि महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम २४ जानेवारीला, तर महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम १ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला आहे.

या परीक्षांकरिता वर्णनात्‍मक स्वरूपाचा नवीन अभ्यासक्रम प्रसिद्धीपत्रकातील तरतुदीप्रमाणे २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू राहील, असेही आयोगाने स्‍पष्ट केले आहे. या निर्णयाचे पडसाद उमटू लागले असून, काही उमेदवार व संघटनांकडून विरोध सुरू झाला आहे. येत्‍या काही दिवसांत हा मुद्दा चांगलाच तापणार असल्‍याचे चिन्‍ह निर्माण झालेले आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

उमेदवारांमध्ये दोन गट

अभ्यासक्रमातील बदलाचे काही उमेदवारांकडून समर्थन केले जाते आहे. प्रत्‍येकवेळी होणारा विरोध, न्‍यायालयात दाखल होणाऱ्या याचिका यांसह अन्‍य विविध कारणांमुळे भरतीप्रक्रिया लांबली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्‍वायत्त संस्‍था असून, त्‍यांच्‍या निर्णयाचा स्‍वीकार करावा, अशी भूमिका मांडणारा उमेदवारांचा एक गट आहे. नाहक विरोध करत भरतीप्रक्रिया प्रभावित न करण्याची विनंती या उमेदवारांकडून संघटनांना केली जात असल्‍याचेही समोर येत आहे.

अधिकृत आदेशाची प्रतीक्षा

उमेदवारांचे हित लक्षात घेता, राज्‍य सेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाकडे केली होती. या घटनेला आठवडा उलटलेला असताना आयोगाकडून यासंदर्भात ठोस निर्णय जाहीर केलेला नसून, उमेदवारांना प्रतीक्षा आहे.

विलंब होत असल्‍याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होतो असून, आयोगाने याबाबत स्‍पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी होत आहे.