Dhule News : ‘त्या’ बालकांच्या संगोपन अनुदानात वाढ; एप्रिलपासून अंमलबजावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children looss their parents in corona death

Dhule News : ‘त्या’ बालकांच्या संगोपन अनुदानात वाढ; एप्रिलपासून अंमलबजावणी

धुळे : बालसंगोपन योजनेंतर्गत कोविड-१९ (Covid 19) मुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी संगोपन अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

एक हजार १०० रुपयांवरून अडीच हजार रुपये अशी ही वाढ करण्यात आली असून, १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. (Child care subsidy for children who have lost their parents due to covid 19 has been increased under Child Care Scheme dhule news)

अनाथ, निराश्रित, बेघर व अन्यप्रकारे आपत्तीत असलेल्या बालकांचे संस्थात्मक व कौटुंबिक वातावरणात संगोपन होण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे.

एखाद्या बालकाच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ते बालक अनाथ होते. त्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षण, आरोग्य व इतर समस्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत बालकांना बालसंगोपन योजनेंतर्गत अठरा वर्षांपर्यंत पालनपोषण, शिक्षण प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

बालसंगोपन योजनेंतर्गत लाभार्थी बालकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे हा उद्देश आहे. बालकांना त्यांच्या संगोपनासाठी इतर कुणावरही अवलंबून राहावे लागू नये, या उद्देशाने बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

बालकांचे यथायोग्य पालनपोषण करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी पुरेशी रक्कम पालनकर्त्या कुटुंबाला उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेंतर्गत पालकास बालकांच्या संगोपनासाठी मिळणाऱ्या अनुदान व संस्थेस उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे.

अशी आहे वाढ

बालकांच्या संगोपनासाठी पालकास प्राप्त होणाऱ्या परिपोषण अनुदानात एक हजार १०० रुपयांवरून दोन हजार २५० रुपये वाढ करण्यात आली आहे, तर संस्थेस उपलब्ध करण्यात येणारे प्रतिबालक प्रतिमहा अनुदान १२५ रुपयांवरून २५० रुपये असे करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण अडीच हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. अनुदानात होणारी वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात येईल.