Loksabha 2019 : पंतप्रधानपदी पुन्हा एकदा मोदींना संधी द्या : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

सटाणा  : देशाचा पंतप्रधान ठरविणार्‍या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधींचे भाषण म्हणजे एक मनोरंजन असते. मात्र ही निवडणूक विकासाची, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तनाची व राष्ट्रीय अस्मितेची असल्याने बागलाण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून कमळ या निशाणीवर आपले बहुमूल्य मत द्यावे आणि देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना संधी द्यावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

येथील पाठक मैदानावर धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपा – शिवसेना महायुतीचे उमेदवार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत श्री. फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, दादाभाऊ भुसे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. प्रशांत पाटील, अण्णासाहेब सावंत, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, माजी आमदार दिलीप बोरसे, निलेश कचवे, साहेबराव सोनवणे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, गरिबांच्या कल्याणासाठी खरी लढाई मोदींनी केली. ८० हजार कोटी गरिबांचे जनधन योजने अंतर्गत बँकेत खाते उघडले. मोदींनी न खाऊंगा न खाने दुंगा, या प्रमाणे थेट लाभार्थ्यांच्या जनधन खात्यात निधी वर्ग केला. स्वच्छ प्रशासनामुळे आबू नाही, बाबू नाही, दलाल नाही. त्यामुळे कोंग्रेसने उभी केलेली भ्रष्टाचारी फौज दूर झाली. उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत योजना या जनहितच्या योजना राबवित शेतकर्‍यांना पेन्शन देणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. सटाणा शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या पुनद पाणी योजनेस विरोध असलेल्या कळवण व देवळा तालुक्यातील शेतकर्‍यांशी समन्वय साधून योजना मार्गी लावण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

उमेदवार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, बागलाण तालुक्यातील गेल्या २५ वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प सोडविण्यात यश आले. ज्या योजना कोंग्रेस शासनाच्या काळात मापदंडात बसल्या नाहीत, त्यांना पुन्हा मंजूरी घेऊन कामे मार्गी लावली. हरणबारी उजवा कालव्याच्या कामास मंजूरी मिळविली. अप्पर पुनंद या महत्वाकांक्षी योजनेसाठी पुनंद धरणाच्या पाण्यावर ८२ दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित केले. मोसम, आरम, हत्ती या नद्यांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास शासनाकडून मंजूरी मिळवून दिली. सटाणा शहरासाठी ५१ कोटी रुपये खर्चाची पुनंद पाणीयोजना, केळझर डावा कालवा, सुळे डावा कालवा, केळझर चारी क्रमांक आठ ही सर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा एकदा बागलाणच्या जनतेने कमळ या निशाणीचे बटन दाबण्याचे आवाहन डॉ.भामरे यांनी केले. मंत्री महाजन, रावल आदींची भाषणे झाली. सभेस नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

सटाणा शहरात गेल्या चार महिन्यापासून भीषण पाणीटंचाई आहे. पुनंद पाणी योजनेचे काम अद्याप प्रलंबित असल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ ने पहिल्या पानावर ‘सटाणावासीय दहा दिवसांपासून पाण्याविना, पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जाहीर सभेत व्यासपीठावर ‘सकाळ’ चा अंकच थेट मुख्यमंत्र्यांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बातमीचे वाचन करून योजनेबाबत आपल्या भाषणात प्रतिसाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com