
Dhule News: आगळीवेगळी सोंगे अन् वेशभूषेमुळे रंगत दुर्बडयासह परिसरात ‘मेलादा’ची धूम
वकवाड : शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांत वसलेल्या दुर्बड्यासह आदिवासी गावपाड्यात भोंगऱ्या व होलिकोत्सवानंतर ‘मेलादा’ची धूम सुरू असून, हा पारंपरिक सण साजरा करण्यासाठी आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
या पार्श्वभूमीवर गावातील वातावरणात उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, होळीनिमित्त गावामधील नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, आदिवासी गाव-पाडे वर्दळीने गजबजले आहेत.
दुर्बड्या येथे मंगळवारपासून मेलादा उत्सवाला प्रारंभ झाला. आदिवासी बांधवांचा होळी, हा सण आदिम सांस्कृतिक सण आहे. मेलादा आदिवासी बांधवांचे नवसपूर्तीचे ठिकाण आहे. त्यामुळे विशेष महत्त्व असून, परिसरात आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
आदिवासी बांधव होळीपूर्वी पाच दिवस उपवास करतात. होळीच्या जागेवर एक चूल तयार करून ‘अंगार’ तयार केला जातो. त्यासाठी खैराच्या लाकडांचा उपयोग केला जातो. संपूर्ण ग्रामस्थ एकत्र नवसपूर्ती करतात. काही आदिवासी बांधव नवसपूर्तीसाठी विस्तवावर चालून नवसपूर्ती करतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे.
गैरसोय टाळण्याचे प्रयत्न
सरपंच भिकेश पावरा, उपसरपंच साहेबराव पावरा, पंचायत समिती सभापती लताबाई पावरा, माजी समाज कल्याण सभापती वसंत पावरा, जिल्हा परिषद सदस्या मोगराबाई पाडवी, पोलिसपाटील लवकुश पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पाडवी, जयवंत पाडवी, वकवाड सोसायटीचे अध्यक्ष इंद्रसिंग पावरा, दिनेश पावरा ग्रामपंचायत सदस्या सपना पावरा, जतलीबाई पावरा, शनीबाई पावरा, राकेश पावरा, प्रवीण पावरा, नानटा पावरा आदींनी मेलादात आलेल्या बांधवांची गैरसोय होणार नाही याबाबत विशेष काळजी घेतली.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
नृत्याविष्काराने आणली रंगत
मेलादा पाहण्यासाठी बाहेरगावाहून डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी तरुणाईसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. डोक्यावर रंगबेरंगी पिसारे, मुकुट, उघड्या अंगावर पांढरे ठसे, कंबरेला भोपळा, मोठ्या घुंगरांची माळ आणि आगळीवेगळी सोंगे घेऊन थिरकणाऱ्या या पथकांच्या नृत्यातून बहारदार संगीतनिर्मिती झाली. संथ लयीत पण जल्लोषात सुरू असलेल्या या नृत्याने सर्वांची दाद मिळविली.