काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा अस्तित्वाचा संघर्ष

कैलास शिंदे
Sunday, 11 August 2019

सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजप सहा, एक अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. युतीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळवून अस्तित्व दाखविण्याचे आव्हान आहे. 

निवडणूक वार्तापत्र :  जळगाव जिल्हा 
जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन लोकसभा आणि अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या दोन्हीही जागा भाजपच्या उमेदवारांनी पटकावल्यात. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजप सहा, एक अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. युतीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळवून अस्तित्व दाखविण्याचे आव्हान आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे नुकत्याच इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५०, तर काँग्रेसकडे ४५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. शिवसेनेतर्फे युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी जळगाव येथून जनआशीर्वाद यात्रेस प्रारंभ केला. मात्र त्यांच्यातर्फे अद्याप इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या नाहीत. भाजपतर्फेही निवडणुकीची तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत रावेरमधून रक्षा खडसे, तर जळगावमधून उन्मेश पाटील असे भाजपचे दोन्हीही उमेदवार विजयी झाले. जळगावमधून राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर तर रावेरमधून काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील विरोधी उमेदवार होते. त्या वेळी सर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपला आघाडी मिळाली आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदार संघातून शिवसेनेचे माजी मंत्री आणि आठ वेळा निवडून आलेले सुरेश जैन यांचा पराभव करून भाजपचे सुरेश भोळे निवडून आले. ते या वेळीही पक्षाकडून इच्छुक आहेत, तर सुरेश जैन शिवसेनेकडून तयारी करीत आहेत. जळगावात काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’कडून तुल्यबळ उमेदवार नाही. जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील पुन्हा मैदानात उतरणार आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांचे नाव आहे, मात्र त्यांचे भाजपमध्ये जाण्याचे तळ्यात मळ्यात आहे. याशिवाय संजय पवार, ज्ञानेश्‍वर महाजन यांची नावे चर्चेत आहेत. 

अमळनेरमधून अपक्ष आमदार शिरीष चौधरी पुन्हा मैदानात आहेत. त्यांच्याविरुद्ध लढण्याची ‘राष्ट्रवादी’तर्फे अनिल भाईदास पाटील यांची तयारी आहे. पाचोऱ्यातून शिवसेनेचे किशोर पाटील यांच्याविरुद्ध ‘राष्ट्रवादी’तर्फे दिलीप वाघ रिंगणात राहण्याची शक्‍यता आहे. मात्र पक्षांतरांत या ठिकाणीही बदलाची चर्चा आहे. चाळीसगाव येथून भाजपचे आमदार उन्मेश पाटील खासदार झाल्याने येथून मंगेश चव्हाण, संपदा उन्मेश पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार अनिल देशमुख मैदानात आहेत.

एरंडोल पारोळ्यामधून ‘राष्ट्रवादी’चे डॉ. सतीश पाटील रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे चिमणराव पाटील तसेच युती न झाल्यास भाजपतर्फे करण पाटील उमेदवार असतील. चोपड्यातून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. त्या ठिकाणाहून  ‘राष्ट्रवादी’तर्फे गेल्या वेळच्या पराभूत माधुरी पाटील यांची पुन्हा तयारी आहे. भुसावळमधून भाजपतर्फे आमदार संजय सावकारे यांना उमेदवारीची शक्‍यता आहे. मात्र पक्षातर्फे ऐनवेळी उमेदवारी बदलण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसतर्फे भक्कम उमेदवार दृष्टिपथात नाही. जामनेरातून भाजपचे गिरीश महाजन यांचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा ‘राष्ट्रवादी’तर्फे शोध सुरू आहे. मुक्ताईनगरमधून भाजपचे एकनाथ खडसे किंवा त्यांच्या कन्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र विरोधकांकडे या मतदारसंघात टक्कर देणारा सक्षम उमेदवार नाही. 

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही तयारी सुरू असून, युती न झाल्यास त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. रावेर-यावल मतदारसंघातून भाजपचे हरिभाऊ जावळे आमदार आहेत, त्यांच्य विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी रिंगणात राहू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP struggle