
Dhule News : हद्दवाढीतील गावांच्या समस्या सोडवा; काँग्रेसचे मनपास निवेदन
धुळे : येथील महापालिका हद्दवाढीतील ११ गावांमधील मूलभूत समस्या सोडवाव्यात आणि लादलेली वाढीव मालमत्ता करवाढ स्थगित करण्यात यावी, रहिवाशांना जागेचा ८ ‘अ’चा उतारा व बखळ जागेचा उतारा देण्यात यावा,
अशी मागणी काँग्रेसच्या (Congress) शिष्टमंडळाने मनपा आयुक्त देवीदास टेकाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (congress statement to municipal corporation to Solve problems of villages in demarcation dhule news)
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आणि काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चाही केली.
हद्दवाढीत अंशतः नगावसह वलवाडी, महिंदळे, भोकर, मोराणे प्र.ल., चितोड, अवधान, पिंपरी, बाळापूर, नकाणे, वरखेडीचा समावेश आहे. महापालिकेत समावेशानंतर या गावांत महत्त्वाची विकासकामे झालेली नाहीत. मूलभूत सुविधांची वानवा आहे. विकासाबाबत या गावांवर अन्याय होत आहे.
असे असताना मनपाने हद्दवाढीतील रहिवाशांना दुप्पट-तिपटीने वाढीव मालमत्ता कर आकारला आहे. याविरोधात रहिवाशांनी घेतलेल्या हरकती प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष असून, वाढीव मालमत्ता करास स्थगितीची मागणी झाली आहे. तसेच महापालिकेमार्फत विविध कागदपत्रांसह प्रशासकीय सेवाही दिल्या जात नाहीत.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
घर, बखळ जागेचा उतारा मिळत नाही. त्यामुळे प्लॅन मंजुरी मिळत नाही. ती देण्यात यावी. मालमत्तेची रजिस्टर खरेदीही सुरू करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भामरे, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, ज्येष्ठ रमेश श्रीखंडे, छोटूभाऊ चौधरी, दीपक गवळे, बापू खैरनार, ऋषी ठाकरे, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, पप्पू सहानी,
हरिभाऊ चौधरी, रजिया सुलताना सय्यद, जावेद देशमुख, आनंद जावडेकर, समाधान मोरे, भटू महाले, राजेंद्र खैरनार, हरिभाऊ अजळकर, इम्तियाज पठाण, अबरार अन्सारी, अमजद खान पठाण, रोहन कोळी, कैलास पाटील, प्रकाश शर्मा, जावेद देशमुख, बानूबाई शिरसाट, अलकाबाई कोळी आदी उपस्थित होते.