प्रशासनाच्या झोपेमुळे जळगाव बनले "हॉटस्पॉट' 

सचिन जोशी
Sunday, 3 May 2020

लॉकडाऊनची "लक्ष्मणरेषा' ओलांडल्याची गंभीर चूक नागरिकांनी केली आणि त्या चुकीकडे झोपेत असलेल्या जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून जळगाव "हॉटस्पॉट' बनले.. दुर्दैव असे की, आजही ना नागरिकांचा बेजबाबदारपणा गेलाय ना प्रशासनाची झोप उघडलीय.. 

18 एप्रिलपर्यंत केवळ दोन रुग्ण.. पैकी एकाचा मृत्यू, तर दुसरा पूर्ण बरा होऊन घरी.. असे जळगाव जिल्ह्याचे सकारात्मक चित्र. 18 एप्रिलच्या रात्री अमळनेर तालुक्‍यातील महिला कोरोना बाधित आढळली आणि नंतर पुढे दररोज, दिवसाआड असे रुग्ण आढळत गेले.. दोनच आठवड्यात हा आकडा तब्बल 45वर जाऊन पोचला.. लॉकडाऊनची "लक्ष्मणरेषा' ओलांडल्याची गंभीर चूक नागरिकांनी केली आणि त्या चुकीकडे झोपेत असलेल्या जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून जळगाव "हॉटस्पॉट' बनले.. दुर्दैव असे की, आजही ना नागरिकांचा बेजबाबदारपणा गेलाय ना प्रशासनाची झोप उघडलीय.. 
खरेतर कोरोना बाधितांचा आकडा देशात व राज्यात वाढत असताना जळगाव जिल्हा आणि खानदेशाने हा संसर्ग बऱ्यापैकी रोखून धरला होता. मार्चच्या 24ला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाले, त्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण खानदेशने त्याची अंमलबजावणी काही अपवाद वगळता प्रामाणिकपणे केले. तरीही जळगावात 28 मार्चला पहिला रुग्ण आढळून आला, त्याला दुबई प्रवासाची पार्श्‍वभूमी होती. प्रशासनाने त्यावेळी लगेचच मेहरुण परिसर सील केला आणि प्रभावी उपाययोजनाही राबविल्या. 30 मार्चला दुसरा सालारनगरातील रुग्ण बाधित आढळला, त्याचा 1 एप्रिलला मृत्यूही झाला. नंतरच्या तब्बल 18 दिवसांत जळगाव जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. याचदरम्यान पहिला रुग्णही बरा झाला आणि जळगाव जिल्हा "ग्रीन झोन' बनला. धुळे, नंदूरबार जिल्ह्याचीही स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. 
दुर्दैवाने याच "सेफ झोन'च्या वातावरणामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा सुस्त बनली आणि नागरिक उदासीन. लॉकडाऊन सुरु होतेच, मात्र त्याचा कुठेही परिणाम जाणवत नव्हता.. तसा तो आज जळगाव जिल्ह्यात पन्नाशी आणि खानदेशात कोरोना बाधितांची शंभरी होत असतानाही जाणवत नाहीच, हा भाग वेगळा. पण, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जळगावसह धुळे व नंदूरबार जिल्ह्यात कोरोना बाधितांचे निष्पन्न होण्याची मालिका सुरु झाली, ती आजपर्यंत थांबलेली नाही.. उलटपक्षी वाढतच चाललीय. 
एकट्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 18 एप्रिलला जी अमळनेर तालुक्‍यातील महिला बाधित आढळली, तिने पुणे, कोल्हापूर असा प्रवास केल्याचे समोर आलेय.. नंतर अमळनेर शहरातील आणखी रुग्ण आढळत गेले, त्यांचाही "छुप्या' प्रवाशांच्या संपर्काची पार्श्‍वभूमी आहे. अमळनेरची रुग्णसंख्या 20वर पोचली, भुसावळचे 8 रुग्ण झालेत, पाचोऱ्यातील संख्या 5वर गेली.. जळगावात आठ रुग्णांची नोंद आहे... पण, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासन व पोलिस अधीक्षकांची यंत्रणा कमालीची सुस्त आहे. ना लॉकडाऊनची अंमलबजावणी, ना सोशल डिस्टन्सिंगवर देखरेख.. 
लॉकडाऊन-1 जाहीर करतानाच पंतप्रधानांनी "लक्ष्मणरेषा' ओलांडू नका, असे बजावले होते. पण, जळगाव जिल्ह्यातील नागरिक कोरोनारुपी राक्षसाच्या प्रतीक्षाच करताय, या आविर्भावात लॉकडाऊनची "लक्ष्मणरेषा' ओलांडतांय... अन्‌ त्यांना अडविणारा प्रशासनरुपी "लक्ष्मण' कुठेही दिसत नाहीये.. जिल्हाधिकाऱ्यांचे "वर्क फ्रॉम ऑफीस' सुरु आहे, पण ते फिल्डवर दिसत नाहीत. तर पोलिस अधीक्षकांची यंत्रणा दारुच्या मागे लागलीय. लॉकडाऊन असताना कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे दुर्दैवी व चिंताजनक चित्र जळगाव जिल्ह्यात दिसतेय.. रुग्णसंख्या पन्नाशीपर्यंत पोचलीय.. लंकायुद्धाच्या वेळी कुंभकर्णाने जागे होत कर्तव्य निभावले होते, पण कोरोनाविरोधातील युद्धाच्या प्रसंगी जळगाव जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणेची झोप उघडायला तयार नाही, मग प्रशासनाच्या या झोपेला "कुंभकर्णी' म्हटले तर, त्या कर्तव्यनिष्ठ योद्‌ध्याचा अपमान केल्यासारखेच होईल, नाही का? 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona jalgaon dist administration, police department failure