धुळे जिल्ह्यात सात केंद्रांवर कोविडचे लसीकरण; यंत्रणा सज्ज करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सुचना

रमाकांत घोडराज
Wednesday, 13 January 2021

आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांवर शीतपेटीची व्यवस्था, लस वाहतूक आदींबाबत नियोजन करावे. पहिल्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल.

धुळे : कोरोनावरील (COVID१९) लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात चार व शहरी भागात तीन अशा सात केंद्रांवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. या मोहिमेच्या अनुषंगाने परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. 

आवश्य वाचा- आधार लिंकिंग नसल्यास धान्यपुरवठा बंद; शासनाचा इशारा

 

कोरोनावरील लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी (ता. १२) सायंकाळी आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजीज शेख, श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते. 
 

आवर्जून वाचा- नंदूरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी सात केंद्रे कार्यान्वित; १६ जानेवारीपासून लसीकरण*

नियोजन करा, सतर्क राहा 
कोविड-१९ वरील लसीकरणाला मान्यता मिळाली असून, त्या अनुषंगाने ८ जानेवारीला धुळे जिल्ह्यात चार ठिकाणी ‘ड्राय रन’ घेतला. आता १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरवात होईल. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांवर शीतपेटीची व्यवस्था, लस वाहतूक आदींबाबत नियोजन करावे. पहिल्या टप्प्यात ज्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल त्यांना लसीकरणाची माहिती द्यावी. लसीकरण केंद्रावर आवश्यक साधनसामग्री, इंटरनेट, वीजपुरवठा, सुरक्षितता आदी बाबींची पडताळणी करून घ्यावी. लसीकरण केंद्रांवर पाच लसीकरण अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल. लसीकरण करताना आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, खबरदारी घ्यावी, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्याही वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या. 
 
दहा हजारांवर नोंदणी 
कोविड लसीकरणासाठी धुळे जिल्ह्यात दहा हजार १४७ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० जणांना लस देण्यात येईल. लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नवले यांनी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, महापालिका आरोग्याधिकारी डॉ. मोरे यांनी लसीकरणाची सविस्तर माहिती दिली.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona marathi news jalgaon corona vaccination seven centar collector orders systym updet