हवेत फायरिंग करून दहशत माजविणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या  

निखील सुर्यवंशी
Thursday, 31 December 2020

एलसीबी पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील बिलाडी शिवारातून संशयित शकील शेखला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत २५ हजारांचा गावठी बनावटीचा कट्टा व सहाशे रुपयांची जिवंत काडतुसे आढळली.

धुळे  ः शहरातील देवपूर परिसरात सर्रास गावठी कट्ट्यातून हवेत फायरिंगद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखे(एलसीबी)च्या पथकाने बेड्या ठोकल्या. संशयिताकडून २५ हजार ६०० रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे पथकाने हस्तगत केले. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

आवश्य वाचा- वयोवृध्द जोडपे गाढ झोपेत..चोर आले आणि कोयत्याने धमकावत लुटून गेले ! 

जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईची सूचना दिली आहे. या पार्श्वभूमीवर एलसीबी पथक कारवाई करीत आहे. यात पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी स्टार्च फॅक्टरी परिसरात बिलाडी मार्गावर मंगळवारी (ता. २९) सायंकाळी शकील सलीम शेख (रा. अंबिकानगर, धुळे) याने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून त्याने दहशत निर्माण केल्याची माहिती निरीक्षक बुधवंत यांना मिळाली. 

माग काढत एलसीबी पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील बिलाडी शिवारातून संशयित शकील शेखला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत २५ हजारांचा गावठी बनावटीचा कट्टा व सहाशे रुपयांची जिवंत काडतुसे आढळली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. हवालदार राहुल सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक बुधवंत, सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक हनुमान उगले, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, रफीक पठाण, संजय पाटील, राहुल सानप, गौतम सपकाळे, विलास पाटील यांनी कारवाई केली.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime marathi news dhule suspect arrested for revolver firing