महागाईने रिक्षा व्यवसायापुढे संकटे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

नंदुरबारः रिक्षा चालविणे हा व्यवसायही आता संकटात सापडला आहे. वाढती महागाई, वाढलेली रिक्षांची संख्या आणि स्पर्धेमुळे रिक्षाचालकांपुढे अनेक प्रश्‍न ‘आ’वासून उभे आहेत. दोन- दोन तास रिक्षाला भाडे लागत नाही. दिवसभरात दोन-तीनशे रुपये पदरात पडतात. त्यातच रिक्षा घेण्यासाठी काढलेले पतसंस्था, बॅंकांच्या कर्जाचे हप्ते, घराचे भाडे, दैनंदिन खर्च यांची ताळमेळ बसविताना नाकीनऊ येते. अशा अनेक समस्यांचा पट रिक्षाचालकांनी ‘सकाळ’शी बोलताना उलगडला.

नंदुरबारः रिक्षा चालविणे हा व्यवसायही आता संकटात सापडला आहे. वाढती महागाई, वाढलेली रिक्षांची संख्या आणि स्पर्धेमुळे रिक्षाचालकांपुढे अनेक प्रश्‍न ‘आ’वासून उभे आहेत. दोन- दोन तास रिक्षाला भाडे लागत नाही. दिवसभरात दोन-तीनशे रुपये पदरात पडतात. त्यातच रिक्षा घेण्यासाठी काढलेले पतसंस्था, बॅंकांच्या कर्जाचे हप्ते, घराचे भाडे, दैनंदिन खर्च यांची ताळमेळ बसविताना नाकीनऊ येते. अशा अनेक समस्यांचा पट रिक्षाचालकांनी ‘सकाळ’शी बोलताना उलगडला.

नंदुरबार हे वीस वर्षांपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते. मात्र, सुरत- भुसावळ रेल्वेमार्ग, महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशाला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहराला लहान-मोठ्या व्यवसायांची जोड मिळाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण भाडेतत्त्वावर अथवा बॅंकांकडून कर्ज घेऊन रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत आहेत. शहराचा विचार केला, तरी आज दिवसाला एक हजाराच्या आसपास रिक्षा धावतात. त्यातून किमान दीड हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

नवापूरला कुष्ठरोग जनजागृती

रिक्षाचालक वाढले
जिल्हानिर्मिती होऊन आज वीस वर्षे झाली. जिल्हास्तरावरील विविध शासकीय- निमशासकीय कार्यालये आली. शहरापासून दोन ते दहा किलोमीटरपर्यंत शहराचा विस्तार वाढला. कार्यालयेही लांब गेली. त्यामुळे शासकीय कामानिमित्त असो की कोणी नातेवाइक म्हणून येणाऱ्यांची संख्या वाढली. यामुळे रिक्षा व्यवसायाला चांगला वाव मिळाला. मात्र, त्यासोबतच रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्याही वाढली. चौकाचौकांत रिक्षा उभ्या राहायला लागल्या. त्यातून भाड्याची स्पर्धा वाढली. त्यामुळे जिल्हानिर्मितीनंतर रिक्षा व्यवसायाला चालना मिळाली असली, तरी रिक्षाचालकांची संख्याही वाढल्याने व्यवसायाचे विभाजन होऊन उत्पन्नात फारसा फरक पडला नाही.

संख्या वाढली, भाडे तेवढेच!
रिक्षांची वाढती संख्या, त्यामुळे ठिकठिकाणी निर्माण झालेले रिक्षाथांबे, त्यातच भाडेदराबाबत तफावत, वाढणारी महागाई, वाढलेले पेट्रोलचे दर, अशा एका ना अनेक बाबींमुळे रिक्षाचालकांचे प्रश्‍न दिवासगणिक वाढत आहेत. अनेकांचे आयुष्य रिक्षा व्यवसायात गेल्याने ऐनवेळी व्यवसाय कसा बदलणार, असा प्रश्‍न उभा राहतो. काही जण थकले तर त्यांची मुले रिक्षा चालवीत आहेत. काही गरीब कुटुंबांतील तरुण पोटाची खळगी भरण्यासाठी भाडेतत्त्वावर रिक्षा चालवीत आहेत. काही जण रोजंदारीने रिक्षा चालवून आपले जीवन जगत आहेत. रिक्षाचालक बांधवांची भेट घेऊन प्रत्यक्ष बोलते केले असता, त्यांचे खरे दुःख समजून आले.

पपईला हवी हमीभावाची खात्री

दिवसाकाठी जेमतेम दोनशे रुपये
तासन् तास प्रवाशांची वाट पाहत बसावे लागते. थांब्यावर रिक्षांची रांग लागलेली असते. दोन-तीन तासांत एकाचा नंबर लागतो. त्यातही योग्य भाडे मिळाले तर ठीकच; अन्यथा ५० रुपयांचेही ग्राहक मिळत नाहीत. नंबर लागेपर्यंत ना पोटाला अन्न, ना पाणी मिळते. सकाळी सातपासून घरातून रिक्षा घेऊन निघालेले चालक सायंकाळी घरी परततात, तेव्हा कुठे त्यांना दोनशे- तीनशे रुपये पदरी पडत असल्याच्या भावना रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis ahead of rickshaw business