धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेचा निर्णय; यंदा १२ एप्रिलपासून पीक कर्जवाटप 

farmer lone
farmer lone

धुळे ः धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने १२ एप्रिलपासून नवीन दराने नवीन पीक कर्जवाटपाचा निर्णय घेतला आहे. त्याचा ५० हजार पीक कर्जदार सभासदांना लाभ मिळू शकेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. 
 

बँकेने चालू वर्षातील खरीप हंगामासाठी सात जानेवारी ते सात डिसेंबरपर्यंत नवीन पीक कर्जदर निश्‍चित केले आहे. याबाबत धुळे व नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा झाली. यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी काही पिकांसाठी कर्जदर निश्‍चित झाले. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांसाठी १२ एप्रिलपासून पीक कर्जवाटपास सुरुवात होईल. 
 

बँकेचे विविध निर्णय 
बँकेकडून घेतलेले कर्ज ३१ मार्चपर्यंत परतफेड करणाऱ्या सभासदांना नवीन दरानुसार प्रथम प्राधान्याने आणि तत्काळ कर्ज वाटप केले जाईल. कर्ज रूपे किसान क्रेडीट कार्डामार्फत वाटप होईल. एटीएममधून प्रतिदिन अधिकाधिक वीस हजाराची रोख रक्कम काढता येईल. खते, बियाणे खरेदीसाठी एटीएममधून प्रतिदिन अधिकाधिक २५ हजार रुपये काढता येतील. चालू वर्षी वाढीव पीक कर्जदराने वाटपाचे उद्दिष्ट आहे. सभासदांसाठी बँकेने घेतलेल्या ऑनलाइन सुविधेमार्फत डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा बँकेच्या शाखेतच उपलब्ध असेल. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांना सातबारा आणण्याची गरज नाही. 

वाढीव कर्ज वाटपाची मर्यादा 
बँकेकडून वाढीव कर्ज वाटपाची मर्यादा अशी ः जिरायती पिके- दोन लाख रुपयापर्यंत, ऊस वगळता बारमाही पिके अडीच लाख रुपयांपर्यंत, जिरायती, बागायत, ऊस पिकांसाठी दोन लाख ८० हजार रुपयांपर्यंत. नवीन पीक कर्ज घेण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट २०२० अखेर घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड ३१ मार्च २०२१ पर्यंत करावी. यात एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य व्याजदराने, तर एक लाखावरील रकमेसाठी दोन टक्के व्याजदराने परतफेड करावी. मार्चअखेर गर्दी टाळण्यासाठी याच महिन्यात कर्जफेड करावी आणि नवीन कर्ज घेण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी पात्र व्हावे, असे आवाहन संचालकांसह अध्यक्ष कदमबांडे, सीईओ चौधरी यांनी केले. 

गेल्या वर्षीचे उद्दिष्ट 
धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेने गेल्या खरीप व रब्बी हंगामात दोन्ही जिल्हे मिळून सरासरी १९८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले होते. हे प्रमाण ९४ टक्के होते. त्यावेळी ३५ हजार सभासद शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ झाला होता. यंदा उद्दिष्ट वाढून लाभार्थी सभासद संख्या ५० हजार करण्यात आली आहे. 


पिकाचा प्रकार...................एकरी पीक कर्जदर (रूपयांत) 
..................................धुळे जिल्हा.............नंदुरबार जिल्हा 
१. संकरित कापूस बागायत...२७,०००...............२७,००० 
२. मिरची........................२६,४००...............२४,००० 
३. पपई...........................१६,५००...............३०,००० 
४. ऊस...........................४४,०००...............४०,००० 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com