
रोज 2 हजार एकर शेती घटतेय...
नंदुरबार : शेतकऱ्यांनी शेतीबाबत असलेले नैराश्य झटकावे आणि शेती आवडीने करावी. शेतीचे दिवस लवकरच पालटणार आहेत. आपल्या देशात रोज दोन हजार एकर शेती कमी होत चालली आहे. एक दिवस असा येईल मूठभर सोने घ्या आणि पोतीभर धान्य द्या, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. २०२२ हे वर्ष धान्यासाठी उच्चतम भावाचे राहणार आहे, असे प्रतिपादन कृषी विद्यावेत्ता डॉ. मुरलीधर महाजन यांनी केले.
घोटाणे (ता. नंदुरबार) येथे धुळे विभागीय कृषी विस्तार केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. मुरलीधर महाजन यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा घोटाणे, न्याहली, बलदाणे, कार्ली, आसाणे गावातील शेतकऱ्यांनी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ. राजेंद्र दहातोंडे अध्यक्षस्थानी होते. विभागीय विस्तार केंद्राचे प्रा. देसले, कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. उत्तरवार, प्रा. राजेश भावसार, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, मंडल कृषी अधिकारी पी. एच. धनगर, कृषी पर्यवेक्षक एम. जी. ढोडरे, डी. जी. नागरे, एस. बी. पाटील, कृषी सहाय्यक जी. बी. पाटील, तंत्र सहाय्यक पंकज धनगर, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागूल आदी उपस्थित होते.
हेही वाचा: मधमाशा पृथ्वीवरून नष्ट झाल्या तर मानव फक्त 4 वर्षे जगू शकेल
डाॅ. महाजन म्हणाले, की या वर्षापासून धान्याचे भाव सतत वाढत जाणार आहेत. याची चाहूल आपल्याला आतापासूनच लागली आहे. त्यासाठी शासनाला गव्हाची निर्यात बंद करावी लागली. कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. पारंपरिक शेती करणे यापुढे आता चालणार नाही. पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नका. धूळपेरणी अजिबात करू नका. निसर्गाला दोष देण्यापेक्षा पाण्याची उपलब्धता, जमिनीची प्रत, पावसाचा अंदाज याचा सारासार विचार करून पिकांची निवड करावी. पेरणीचे जास्त टप्पे पडत असल्यामुळे कापसावर बोंडअळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा १ जूननंतरच कापसाचे बियाणे मिळणार आहे. दरवर्षी एका बांधावर कमीत कमी ८ झाडे लावा. निवृत्त होत असलो, तरी मी माझा मोबाईल नंबर बदलणार नाही आणि शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करत राहील, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
हेही वाचा: तळपत्या सूर्यामुळे उरल्या फक्त काड्या; वृक्ष जगवण्याकडे दुर्लक्ष
प्रा. राजेंद्र दहातोंडे, प्रा. देसले, हिंमतराव माळी, हरिश्चंद्र पाटील, आशाबाई गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले. एम. जी. ढोडरे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र धनगर यांनी आभार मानले. संतोष धनगर, हिंमतराव माळी, दंगल धनगर, भटू धनगर, नंदलाल धनगर, ज्ञानेश्वर पाटील, कोमलसिंग गिरासे व घोटाणे ग्रामस्थांनी संयोजन केले.
Web Title: Current Situation Of State Agriculture News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..