अयोध्या निकाल पार्श्‍वभूमीवर सायबर सेलची राहणार नजर

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सर्वोच्च न्यायालयाकडून राम जन्मभूमी खटल्याचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांना बंधनकारक राहणार असून, हा निकाल कोणाचाही जय किंवा पराजय नसून तो न्यायालयाचा निर्णय राहणार आहे. त्यामुळे निकाल काहीही असो त्याचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. 

नाशिक : अयोध्यातील राम जन्मभूमी व बाबरी मशीद याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या काही दिवसांत निकाल आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात पोलिस यंत्रणेने उपाययोजना करीत सतर्कता बाळगली आहे. विशेषतः सोशल मीडियावरून प्रक्षोभक संदेश पसरविले जाण्याची शक्‍यता गृहीत धरून सायबर पेट्रोलिंग सुरू केली आहे. 

अयोध्या निकालापूर्वी पोलिसांकडून जिल्ह्यात कडक बंदोबस्त 
सर्वोच्च न्यायालयाकडून राम जन्मभूमी खटल्याचा निकाल येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांना बंधनकारक राहणार असून, हा निकाल कोणाचाही जय किंवा पराजय नसून तो न्यायालयाचा निर्णय राहणार आहे. त्यामुळे निकाल काहीही असो त्याचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. 

सामाजिक सलोखा अबाधित राखण्याचे आवाहन

शहर- जिल्ह्यात पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेत सामाजिक सलोखा अबाधित राखण्याचे आवाहनही केले जात आहे. रविवारी (ता.10) ईद-ए-मिलादही आहे. निकालाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली दोन अपर पोलिस अधीक्षक, आठ पोलिस उपअधीक्षक, 30 पोलिस निरीक्षक, 80 सहाय्यक व उपनिरीक्षक, दोन हजार 500 पोलिस कर्मचारी व 400 होमगार्ड कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त सतर्क आहे. तसेच प्रत्येक पोलिस ठाणेहद्दीत जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरून फिक्‍स पॉइंट, पायी गस्त, वाहनावरील पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे शहरात पात्लिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक आयुक्त, 15 वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सुमारे दोन हजार पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त सज्ज असून, शीघ्र कृतिदल, दंगानियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दल यांसह विविध पथके सज्ज आहेत. 

सायबर सेल सतर्क 
व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम यांसह सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालासंदर्भात प्रक्षोभक संदेश पसरविले जाण्याची शक्‍यता आहे. त्यापार्श्‍वभूमीवर सायबर पोलिस सेलकडून विशेष दक्षता बाळगली जात आहे. सायबर पेट्रोलिंगवर भर देण्यात आला आहे. ज्या ग्रुपवर प्रक्षोभक संदेश पसरविले जातील, त्या ग्रुपच्या ऍडमीनवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही संदेश पसरवू नका, असे आवाहन नाशिक सायबर पोलिस ठाण्याकडून करण्यात आले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber ​​Cells look due to Ayodhya results Nashik News