जळगावात "डब्बा ट्रेडिंग' नावाच्या समांतर शेअर बाजारावर छापा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

जळगावात "डब्बा ट्रेडिंग' नावाच्या समांतर शेअर बाजारावर छापा 

जळगावात "डब्बा ट्रेडिंग' नावाच्या समांतर शेअर बाजारावर छापा 

 
जळगावः शहरात "ऑनलाइन ट्रेडिंग' व्यवसायाच्या नावाखाली शेअर बाजाराची समांतर यंत्रणा उभी करून ऑनलाइन सट्टा बाजार चालविला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्‍स व निफ्टीचे दर समोर येतात, त्याच दरावर "डब्बा ट्रेडिंग' नावाने समांतर शेअर बाजार या सटोड्यांनी उभा केला आहे. जी. एस. मैदानासमोरील लक्ष्मण भवनातील छाजेड यांचे कार्यालय आणि गणेश कॉलनीतील अशोक बेकरीसमोरील "राजनंदिनी हाईट्‌स' या जयेश जीवराजानी यांच्या कार्यालयावर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने सायंकाळी छापा टाकला. त्यात एकूण नऊ संशयितांना अटक केली. 
जळगावात शेअर बजारावर मोठ्या प्रमाणात "डब्बा ट्रेडिंग'च्या नावाने अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती डॉ. रोहन यांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, सहाय्यक निरीक्षक संदीप अराक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, राजकुमार हिंगोले यांच्यासह दोन पथके तयार करण्यात येऊन गणेश कॉलनीत अशोक बेकरीच्या गल्लीतील राजनंदिनी अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये (क्र. 401) छापा टाकल्यावर पंधरा ते वीस मोबाईल, पाच-सहा लॅपटॉपसह ऑनलाइन खरेदी-विक्रीची कसरत सुरू होती. पोलिसांना पाहून हबकलेले सटोडे पळण्याच्या आतच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली आणि ट्रेडर्स जयेश रजनीकांत जीवराजानी (वय 49, रा. राजनंदिनी हाईट्‌स), दर्शन जवाहरलाल जानी (वय 35, गणेश गार्डन, रिंगरोड), उदय श्रीनिवास क्षीरसागर (वय 33, मूळ आंबेवडगाव पठार, पुणे), मनीष बाबूराव वांझट (वय 34, रायसोनीनगर), दीपक दिलीप अहिरे (वय 26, समतानगर), भगवान माणिक चव्हाण (वय 33, मेहरुण) यांना अटक करण्यात येऊन मुद्देमाल व खातेवाह्या ताब्यात घेतल्या. तर जी. एस. मैदानासमोरील "लक्ष्मण भवना'त टाकलेल्या छाप्यात चेतन लखीचंद छाजेड (वय 34, रा. संमित्र कॉलनी, जळगाव), राहुल ईश्‍वर पाटील (वय 29, खोटेनगर), उमेश बन्सीलाल छाजेड (वय 29, दादावाडी, जळगाव) या संशयितांना डॉ. रोहन यांच्या पथकाने ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात कारवाईबाबत वरिष्ठांसह तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे काम सरू होते. एकूणच पंचनाम्यानंतर मध्यरात्रीनंतर दोन्ही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 

सहा महिन्यांपूर्वीच हल्ला 
जी. एस. मैदानासमोरील चेतन लखीचंद छाजेड (वय 34) यांच्यावर चार महिन्यांपूर्वी पैसे वसुली करणाऱ्या टोळीने हल्ला चढवून मारहाण केली होती. त्यावेळी किरकोळ तक्रारीनंतर आपसांत समझोता झाला. मात्र, त्या हल्ल्याचा बदला नुकताच गेल्या महिन्यात घेतला गेला. त्यात दोन तरुणांना चाकूने भोसकल्याचे स्वतंत्र गुन्हे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असून, हल्लेखोर अद्याप फरार आहेत. या गुन्ह्यातील प्रमुख संशयित नीलेश सपकाळे याची दुचाकी छाजेड याच्या घरून जप्त केल्याची माहिती डॉ. रोहन यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

"डब्बा ट्रेडिंग' आहे तरी काय? 
केवळ फोनवर चालणाऱ्या या अवैध व्यवसायाची पाळेमुळे संपूर्ण देशात पसरली असून, जळगावात बसून आखाती देशांचा काळा पैसा यात लावला जातो. शेअर बाजारात शेअर खरेदीसाठी अधिकृत "डी-मॅट अकौंट' असावे लागते. ज्याचे "डी-मॅट अकौंट' आहे तोच शेअरची खरेदी- विक्री करू शकतो आणि खात्यातून त्याचे पैसे वजा होतात किंवा वाढत जातात. शेअर बाजाराच्या समांतर चालणाऱ्या "डब्बा ट्रेडिंग' या प्रकारात शेअर बाजारातील आंतरराष्ट्रीय निफ्टी आणि देश पातळीवरील सेन्सेक्‍स अशा दोघांच्या खऱ्याखुऱ्या दरावर रोख स्वरूपात हे सटोडे बुकिंग करतात. दर आठवड्याला त्यांच्याकडे पैसा लावणाऱ्यांना नुकसान झाले, तर गुंडांकरवी वसुली करतात. नफा झाल्यावर तो पैसा त्यांना दिला जातो. अवैध व्यवसायाचे स्वरूप असलेल्या या प्रकारात काळा पैसा लावला जातो. यातील व्यवहार केवळ फोनवर चालतो आणि वसुलीसाठी गॅग पोसल्या जातात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dababa traidingavar shaapa