जानकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक ; आंदोलक व पोलिसांची झटापट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

दूध धंदा बंद करण्याचा हा डाव असून, दुग्धविकासमंत्री जानकरांचा मंत्रालयासामोरच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देण्यात येईल. दूध भाववाढीच्या आश्वासनांची पूर्तता न करणारे जानकर हे थापाड्या मंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली. 

नेवासे : गायीच्या दुधाला 35 रुपये प्रतिलिटर भाव, शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह विविध 15 मागण्यांसाठी प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खुपसे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. 5) नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.

यावेळी आंदोलक व पोलिसांची चांगलीच झटापट झाली. दरम्यान, पोलिसांनी प्रहारच्या दहा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 60 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. 

अतुल खुपसे म्हणाले, "राज्यात कर्जमाफी मिळाल्यानंतरही 696 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळाला नाही. दूध धंदा बंद करण्याचा हा डाव असून, दुग्धविकासमंत्री जानकरांचा मंत्रालयासामोरच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशी देण्यात येईल. दूध भाववाढीच्या आश्वासनांची पूर्तता न करणारे जानकर हे थापाड्या मंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली. 

अभिजित पोटे म्हणाले, "येत्या 9 मे रोजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जनावरांसह मंत्रालयावर मोर्चा काढणार असून, दूधउत्पादकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी वारकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बावस्कर, नितीन पानसरे, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले यांची भाषणे झाली. आंदोलनात नेवासे तालुक्‍यातील शेकडो दूधउत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. 
निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोदसिंह परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, श्‍याम ढोकणे, रघुनाथ आरगडे, विजय म्हस्के, नागेश आघाव, संगिता शर्मा, गणेश झगरे, गणेश चौघुले उपस्थित होते. 

दरम्यान, रस्ता अडवून, जमाव जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल प्रहारच्या प्रमुख दहा पदाधिकाऱ्यांसह एकूण 50-60 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dagdhhebhisak to the statue of Janakar Protesters and Police Strike