धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी पाटील, गिरासेंच्या शेतात पाहणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

दोंडाईचा - शेतकरी धर्मा पाटील आत्महत्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्‍याम दरणे यांनी आज विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे धर्मा पाटील आणि पद्मसिंह गिरासे यांच्या वादग्रस्त शेताची पाहणी केली. त्या वेळी गिरासे यांच्या शेतातील डाळिंबाच्या झाडाचे अवशेष श्री. दरणे यांनी मोबाईलमधील कॅमेऱ्याद्वारे बंदिस्त केले.

दोंडाईचा - शेतकरी धर्मा पाटील आत्महत्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्‍याम दरणे यांनी आज विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे धर्मा पाटील आणि पद्मसिंह गिरासे यांच्या वादग्रस्त शेताची पाहणी केली. त्या वेळी गिरासे यांच्या शेतातील डाळिंबाच्या झाडाचे अवशेष श्री. दरणे यांनी मोबाईलमधील कॅमेऱ्याद्वारे बंदिस्त केले.

राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केल्यावर श्री. दरणे यांनी कामकाज सुरू केले आहे. त्यांनी सकाळी नऊला विखरण येथे "महाजेनको'चे सहायक अभियंता जितेंद्र पवार व सहकाऱ्यांशी चर्चा केली. आवश्‍यक ती माहिती घेतली. नंतर (कै.) धर्मा पाटील, त्यांच्या शेजारील शेतकरी पद्मसिंह गिरासे यांच्या शेताची पाहणी केली. गिरासे यांच्या शेतातील डाळिंबाच्या झाडाचे अवशेष छायाचित्राद्वारे संकलित केले. यापाठोपाठ विजय पाटील, अंबालाल रामसिंह गिरासे, जयपाल गिरासे यांच्या फळबाग जागेची पाहणी केली.

शेतकऱ्यांनी साधला संवाद
या तपासणीवेळी आठ ते दहा शेतकरी जमले. त्यांनी भूसंपादन व मोबदला प्रक्रियेतील त्रुटी, जमिनीचा असमाधानकारक दर यासह आनुषंगिक प्रश्‍न श्री. दरणे यांच्याशी चर्चेवेळी उपस्थित केले.

प्रत्युत्तरात "मी न्यायालयीन चौकशीसाठी आलो आहे, तुमच्या प्रश्‍नांची तड सरकार किंवा न्यायालय लावू शकेल', असे श्री. दरणे यांनी संबंधित शेतकऱ्यांना सांगितले. मीदेखील शेतकरी कुटुंबातला असून, हालअपेष्टा जाणतो, माझे वडील वयाच्या 92 व्या वर्षापर्यंत मेमध्येही शेतात जात असत, अशी माहिती चर्चेच्या ओघात श्री. दरणे यांनी दिली.

पुन्हा आज दोंडाईचात
सकाळी साडेअकराला ते दोंडाईचा विश्रामगृहाकडे रवाना झाले. तेथे त्यांनी नरेंद्र धर्मा पाटील, पद्मसिंह गिरासे यांच्याशी चर्चा केली. त्यांना उद्या (ता. 23) सकाळी दहाला पुन्हा दोंडाईचा विश्रामगृहात चौकशीकामी बोलावले आहे. विखरण येथे श्री. दरणे यांच्याकडून होणाऱ्या पाहणीवेळी नरेंद्र धर्मा पाटील, सरपंच दशरथ अहिरे, उपसरपंच शिवाजी पाटील, माजी पोलिस पाटील शांताराम साळुंखे, तलाठी दीपक ईशी, विजय पाटील, राजेंद्र पद्मसिंह गिरासे, रामसिंग राजपूत, विकास पाटील, सोनू राजपूत आदी उपस्थित होते.

चौकशीमागचे कारण
रद्दबातल होण्यापूर्वी दोंडाईचा- विखरण औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांतर्गत माझ्या पाच एकर क्षेत्रांत आंब्याची 650 झाडे असूनही त्यांचे योग्य मूल्यांकन न करता केवळ चार लाखांचा मोबदला आणि शेजारच्या 74 आर. क्षेत्रातील शेतकऱ्याला डाळिंब फळबागेच्या मूल्यांकनापोटी एक कोटी 89 लाखांचा मोबदला दिला जातो. हा अन्याय असल्याची तक्रार करत 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी न्यायाअभावी 22 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ विष प्राशन केले. उपचारावेळी त्यांचा 29 जानेवारीला मृत्यू झाला होता.

चौकशीचे मुद्दे काय?...
- सातबाऱ्यावर दर्शविण्यात आलेल्या 650 आंब्यांच्या रोपासांठी योग्य ती नुकसानभरपाई मिळण्याबाबतची धर्मा पाटील यांची मागणी नियमानुसार तपासणे.
- अन्य जमीनधारकांना झाडांचे मूल्यांकन करताना संबंधित अधिकाऱ्याने रेकॉर्डमध्ये खाडाखोड करून संगनमताने मूल्यांकनाच्या किमतीत वाढ दर्शवून जास्तीची रक्कम नुकसानभरपाई म्हणून दिली असल्याबाबत सखोल चौकशी करणे.
- भूसंपादन प्रस्ताव क्रमांक 4/2009, 7/2009, 5/2011 ची संपूर्ण कायदेशीर चौकशी करणे.
- संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस करणे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dharma patil death case inquiry watching crime