Dhule News : दांडीबहाद्दर मास्तरांवर होणार कारवाई; शिरपूर पंचायत समिती सभापतींचे निर्देश

Dhule : पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत शाळेत गैरहजर आढळलेले मुख्याध्यापक व शिक्षकांची चौकशी केली जाणार आहे.
Shirpur Students attending Zilla Parishad School.
Shirpur Students attending Zilla Parishad School.esakal
Updated on

Dhule News : येथील पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीत शाळेत गैरहजर आढळलेले मुख्याध्यापक व शिक्षकांची चौकशी केली जाणार आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपसभापती विजय बागूल यांनी दिली.

पंचायत समितीच्या सभापती लताबाई पावरा, उपसभापती विजय बागूल, माजी सभापती वसंत पावरा, पंचायत समिती सदस्य राहुल पावरा,

विजय खैरनार यांनी धारबर्डी, जुनी सांगवी, पनाखेड, पळासनेर, हेंद्र्या‍पाडा, चारणपाडा आदी गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांना १६ फेब्रुवारीला अनपेक्षित भेट दिली होती. त्यात रजा संपूनही मुख्याध्यापक हजर झालेले नसणे.

केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकाऱ्यांनी अनेक महिन्यांपासून शाळांना भेटच दिलेली नसणे, पोषण आहार घेतल्यानंतर विद्यार्थी निघून जाणे, अत्यल्प उपस्थिती, खालावलेली शैक्षणिक प्रगती असे प्रकार आढळले. शिक्षण परिषदेतून शिक्षकच बेपत्ता असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता.

विचारला जाब

सभापतींच्या दालनात सभापती लताबाई पावरा, उपसभापती विजय बागूल यांनी मंगळवारी (ता. २०) या प्रकरणी कार्यवाही केली. गटशिक्षणाधिकारी सुलवाडकर, संबंधित शिक्षण विस्ताराधिकारी यांना बोलावून घेत त्यांना शालेय शिक्षणाच्या दुरवस्थेबाबत जाब विचारला.

शिक्षण विस्ताराधिकारी वेळोवेळी शाळेला भेट देत नाहीत, शिक्षकांना जबाबदारीचे भान नाही मग गटशिक्षणाधिकारी काय करताहेत, अशा शब्दांत हजेरी घेण्यात आली. वाहण्यापाणी, आंबाडूकपाडा, तेल्यामहू, सजगर, चोखल्यापाडा येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी गावातील जिल्हा परिषद शाळांबाबत तक्रारी करूनही अद्याप कोणावरच कारवाई केली नसल्याबाबतही पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

दबावाचे राजकारण

दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पितळ उघडे पडलेल्या शिक्षकांनी वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कारवाई कशी टाळता येईल याबाबत प्रयत्न केले. मात्र सभापती, उपसभापतींनी ठोस भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

ग्रामस्थ, सरपंचांनी तक्रार केल्यानंतर शिक्षक संघटना लगेचच आक्रमक होऊन आपल्या सदस्यांची बाजू घेतात, अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. त्यामुळे शिक्षकांवर कारवाई होत नाही. परिणामी, दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील परिस्थिती खालावत असल्याची चर्चा पंचायत समितीमध्ये सुरू होती. आदिवासी भागातील शिक्षणाच्या खेळखंडोब्यामुळे आदिवासी युवक संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांच्यातर्फे तीव्र आंदोलनाची तयारी सुरू आहे.

"आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय प्रगती करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या भवितव्याशी कोणी खेळ करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. यापुढील काळातही अचानक भेटी सुरू ठेवल्या जातील. दांडीबहाद्दर शिक्षकांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत." -विजय बागूल,उपसभापती, शिरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Zilla Parishad sunetra pawar
Kolhapur Zilla Parishad teacher promotion controversy
Tamil Nadu School News
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Marathi News Esakal
www.esakal.com