Dhule Plastic Ban : 4 टन ‘रिसायकलिंग’ला; साडेतीन टन पुन्हा जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plastic Recycling

Dhule Plastic Ban : 4 टन ‘रिसायकलिंग’ला; साडेतीन टन पुन्हा जमा

धुळे : प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून धुळे शहरात अनेक वर्षांपासून कारवाई सुरू आहे. साधारण २०१४ नंतर त्यातही २०१७ ते २०१९ दरम्यान महापालिकेने तब्बल चार टन प्लॅस्टिक जप्त केले. त्यानंतरही ही कारवाई सुरू असून, या वर्षी जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांतच जप्तीच्या कारवाईतून तब्बल साडेतीन हजार किलो प्लॅस्टिक पुन्हा जमा झाले आहे. शिवाय लाखो रुपये दंडही वसूल केला जात आहे. या कारवाईनंतरही शहरात प्लॅस्टिक विक्री, वापर बंद झालेला नाही हे विशेष. (Dhule Plastic Ban 4 tonnes plastic for recycling Three half tons again deposited dhule news)

शहरे, गावे स्वच्छ व्हावीत यासाठी सरकारने स्वच्छता अभियान सुरू केले. केंद्रासह राज्य सरकारांच्या माध्यमातून या स्वच्छतेच्या अनुषंगाने नंतर विविध मोहिमा, अभियाने सुरू झाली. यात स्वच्छतेसह घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्ती, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या प्रकारांना आळा घालणे, तसेच पर्यावरण रक्षण, संवर्धनासाठी प्लॅस्टिक बंदीचाही निर्णय झाला. संकलित होणाऱ्या कचऱ्यात अत्यंत घातक असलेले प्लॅस्टिक बंद व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिकबंदी, सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी व आनुषंगिक कायदे केले गेले. त्याची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुरू झाली.

धुळे महापालिकेतर्फेही गेल्या अनेक वर्षांपासून ही अभियाने राबविली जात आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. नामदेव भोसले असताना प्लॅस्टिकबंदीच्या मोहिमेस जोर आला. डॉ. भोसले तर कुणी सत्कारासाठी बुके आणला असेल व त्याला प्लॅस्टिक गुंडाळलेले असेल तर तो बुकेही स्वीकारत नव्हते अशी स्थिती होती. त्यानंतर आलेल्या आयुक्तांच्या काळातही कारवाया झाल्या. अर्थात स्वच्छता अभियान, स्वच्छ सर्वेक्षणात रँकिंगसाठी अशा कारवाया नियमितपणे सुरू राहिल्या. या सर्व कारवायांतून धुळे शहरातून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक माल जप्तही करण्यात आला.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

हेही वाचा: Dhule Crime News : प्रवासी भासवून लुटणारी टोळी जेरबंद; टोळीत महिलेचेही सहभाग

चार टन माल रिसायकलिंगला

२०१४, २०१७ ते २०१९ दरम्यान महापालिकेच्या माध्यमातून शहरात झालेल्या प्लॅस्टिकबंदीच्या कारवायांतून मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. हा जप्त केलेला माल महापालिकेच्या नवरंग पाण्याच्या टाकीजवळील कार्यालयात साठविला जात होता. दरम्यान, या काळात जप्त केलेला हा प्लॅस्टिक माल तब्बल चार टन अर्थात चार हजार किलो होता. हा सर्व माल नाशिक येथे रिसायकलिंगसाठी एका कंपनीकडे पाठविला होता, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाच महिन्यांत पुन्हा साठा

शासनाच्या १ जुलै २०२२ च्या प्लॅस्टिकबंदी आदेशानंतरही महापालिकेकडून प्लॅस्टिक जप्तीसह दंडात्मक कारवाई झाली. ५ जुलै २०२२ ते २१ नोव्हेंबर २०२२ या साधारण पाच महिन्यांत महापालिकेच्या पथकांनी शहरातून तब्बल सुमारे तीन हजार ६६० किलो प्लॅस्टिक माल जप्त केला आहे. शिवाय संबंधित व्यापारी, दुकानदारांकडून या काळात एक लाख ६० हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. तत्पूर्वीच्या कारवायांतूनही लाखो रुपये दंड वसूल झाला असणार हे निश्‍चित.

हेही वाचा: Nashik News : नाशिकचा विभव ठरला पोडियम पूर्ण करणारा पहिला सायकलिस्ट

टॅग्स :Dhuleplastic ban