विजयात सर्वांचा विश्वासही महत्त्वाचा ठरला - आमदार संजय सावकारे

श्रीकांत जोशी
रविवार, 9 जून 2019

मजबूत संघटन
भाजपचे सर्व पातळ्यांवर तालुक्यात असलेले मजबूत संघटन महत्त्वाचे ठरले. सर्व पदाधिकारी, पन्नाप्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मित्रपक्षांची चांगली साथ मिळाली. या सर्व गोष्टींंचा एकत्रित परिणाम चांगले मताधिक्य रक्षा खडसेंना मिळण्यात झाला. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप- शिवसेना- रिपाइं महायुतीचे यश निश्चित आहे.

भुसावळ - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे; त्याचबरोबर सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुसावळ तालुक्यात सर्वसमाजघटकांना सोबत घेऊन त्यांचा म्हणजेच सर्वांचा विश्वास संपादन केल्यानेच रक्षा खडसे यांना तालुक्यातुन पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळू शकले. मुळात विधानसभेच्या भुसावळ मतदारसंघ भाजप- शिवसेना- रिपाइं (आठवले गट) महायुतीचा बालेकिल्ला आहेच, तो या विजयाने अधिक मजबूत झाला, असा दावा भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

आमदार सावकारे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय विचार तसेच राबविलेली धोरणे मतदारांना पटली. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेली विकासकामे, रक्षा खडसेंचा सततचा जनसंपर्क व आपल्या मतदारसंघातील कामे व्हावीत म्हणून दिल्लीत मंत्र्यांना भेटून त्या करीत असलेला पाठपुरावा यांमुळे विजय मिळविणे भाजपला सोपे गेले. आमचे मार्गदर्शक माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे ऊर्फ नाथाभाऊ यांचे भुसावळवर विशेष प्रेम आहे. त्यांच्या राजकीय मुसद्देगिरीचा फायदा झाला. पाच वर्षांत भुसावळ विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामांना सुरवात झाली. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. यात ग्रामीण रस्ते, नाल्यांवरील पूल, ग्रामीण रुग्णालयात व ट्रामा सेंटर, प्रशासकीय इमारत, उपविभागीय व तालुका पोलिस ठाण्याची अद्ययावत इमारत आदी कामांचा समावेश आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील अमृत योजनेचे काम प्रगतिपथावर आहे.

अल्पसंख्याक समाजाचेही प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. विशेषतः शैक्षणिक सुविधांंकडे लक्ष देण्यात आले.

भुसावळ विधानसभा मतदारसंघ
१,५८,८८४ - झालेले मतदान
९६,३९४ - मते रक्षा खडसे (भाजप)
४४,५०६ - मते डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)
५१,६३९ - मताधिक्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with Sanjay Savkare Politics