मुक्ताईनगर-नगरपंचायत हद्दीत ८५ लाख रुपये खर्चून वृक्ष लागवड व सौर दिवे प्रकल्प राबविण्यात येणार होता. या अंतर्गत ५ हजार झाडांची लागवड होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्ष झाडांची लागवड झाली नसून त्यावर प्रचंड खर्च दाखविण्यात येऊन जवळपास ८५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी मंगळवारी (ता. ११) विधान परिषदेत उपस्थित केला. या कामात प्रत्यक्षात झाडांची लागवड नगण्य झाली असून, आधीच्या योजनेंतर्गत लावलेली झाडेच नव्याने दाखविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, झाडांसाठी आवश्यक असलेले ट्री गार्ड, ठिबक सिंचन, मोटार पाइपलाइन, माती व खतांचा वापरही करण्यात आलेला नाही, तरीही संपूर्ण निधीची बिले काढण्यात आली आहेत.