"राष्ट्रवादी'चे "घड्याळ' बांधण्याचे एकनाथराव खडसेंचे निश्‍चित! 

eknathrao khadse ncp
eknathrao khadse ncp

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यःस्थितीत दोन दिवस ते राज्याबाहेर असून राज्यात परत आल्यानंतर यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करून 20 डिसेंबरपर्यंत त्यांचा प्रवेश सोहळा होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. 
भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी परळी येथील गोपीनाथगडावर नुकत्याच झालेल्या मेळाव्यात "माझा भरवसा धरू नका, मी केव्हाही पक्षांतर करू शकतो', असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू झाली. त्याअगोदर श्री. खडसे दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटून आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईतही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे श्री. खडसे शिवसेनेत जाणार की "राष्ट्रवादी'त याबाबत चर्चा सुरू झाली. त्यातच कॉंग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. खडसे कॉंग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशासंदर्भातील गूढ अधिकच वाढले. अखेर श्री. खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

श्री. खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना छगन भुजबळांचे उदाहरण देण्यात आले. भुजबळ अडचणीत असताना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तसेच त्यांना आता मंत्रिमंडळातही घेण्यात आले. श्री. खडसे यांनाही त्यांच्या पाठीशी "राष्ट्रवादी'च्या नेतृत्वाने खंबीरपणे उभे राहण्याची हमी दिली आहे. याशिवाय मुक्ताईनगर मतदारसंघातील रचनेचा विचार करून त्यांनी "राष्ट्रवादी'मध्ये जाण्याचे निश्‍चित केले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. श्री. खडसे दोन दिवस राज्याबाहेर गेलेले आहेत. तेथून परतल्यावर ते पुढील चर्चा करणार आहेत. त्यानंतर 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशप्रक्रिया निश्‍चित होण्याची शक्‍यताही खात्रीलायक सूत्रांनी सांगितली. विशेष म्हणजे खडसे यांच्या प्रवेशामुळे "राष्ट्रवादी'ला खानदेशसह थेट विदर्भातील मलकापूर, बुलडाणा व अकोला जिल्ह्यापर्यंत फायदा होणार आहे. त्यामुळे "राष्ट्रवादी'तर्फे त्यांना मंत्रिपद देण्याचेही निश्‍चित असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पदाचा विचार न करता केवळ पक्षकार्य म्हणून खडसे यांनी "राष्ट्रवादी'त प्रवेश करण्याचा निर्णय निश्‍चित केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com