नंदुरबार जिल्ह्यात ४४१ सहकारी संस्थांची होणार निवडणूक;  प्राधिकरणाकडून कार्यक्रम जाहीर 

धनराज माळी
Friday, 15 January 2021

सहकारी संस्थांच्या तसेच ज्या संस्थेची निवडणूक मुदत संपलेली आहे, अशा संस्थांच्या निवडणुकीसाठी कामकाज सुरू होणार आहे.

नंदुरबार : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे स्थगित कामकाज १८ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ४४१ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. 
 

आवर्जून वाचा- दुर्मिळ आजार बालिकेला जडला; डॅाक्टरांनी असे केले, की 'ती' स्वतःच्या पायावर घरी चालत गेली !

नंदूरबार जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम ज्या टप्प्यावर होता त्या टप्प्यावर स्थगित झाला होता. अशा सर्व सहकारी संस्थांच्या तसेच ज्या संस्थेची निवडणूक मुदत संपलेली आहे, अशा संस्थांच्या निवडणुकीसाठी कामकाज सुरू होणार आहे. यासाठी कृती आराखडा व नियोजन केले आहे. प्रथम टप्प्यात कोविड-१९ मुळे स्थगित सहकारी संस्थांचे स्थगितीच्या टप्प्यापासून निवडणुकीचे कामकाज सुरू करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांना दिलेल्या आहेत. 

वाचा- व्हाट्सएपने जोडले अठराशे विवाह; सोशल मिडीया ठरतेय मध्यस्‍थी

कोविड-१९ मुळे निवडणूक स्थगित झालेल्या संस्थांनी व संस्थेच्या सभासदांनी निवडणूक घेण्यासाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार या कार्यालयाशी संपर्क साधून निवडणूक घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. काही अडचणी असल्यास निवडणूक कक्ष, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, खोली क्रमांक २२८, नंदुरबार ( दूरध्वनी ०२५६४-२१००२३) वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रताप पाडवी यांनी केले आहे.  

 

,संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election marathi news nandurbar cooperative society announces election program