मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

शहरातील कासमवाडी परिसरात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.​

जळगाव : शहरातील कासमवाडी परिसरात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

श्याम दीक्षित (वय अंदाजे 35, रा. पंचमुखी हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला आहे. रविवारी सकाळी कासमवाडी परिसरात असलेल्या साईबाबा मंदिराच्या प्रांगणात श्याम दीक्षितचा मृतदेह आढळून आला. सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी कळवली.

त्यानंतर औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. पोलिस तपास सुरू असल्याचे सांगत या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

खुनाचे कारण अस्पष्ट - श्याम दीक्षित हा मनसेचा माजी पदाधिकारी होता. मनसेचा शहर उपाध्यक्ष म्हणून त्याने काम पाहिले होते. त्याचा खून का झाला, याचे कारण समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिसांनी श्यामचा भ्रमणध्वनी मिळून आला आहे. परंतु, भ्रमणध्वनीला लॉक असल्याने पोलिसांना अधिक माहिती मिळू शकली नाही. श्यामच्या भ्रमणध्वनीचे शेवटचे लोकेशन, कॉल डिटेल्स काढण्याचे काम सुरू आहे. त्यावरून काही धागेदोरे मिळू शकतात, असे पोलिसांनी सांगितले. या खुनाच्या घटनेमागे काही पूर्ववैमनस्याचे कारण आहे का, या बाजूने देखील पोलीस तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex-MNS party worker murdered in Jalgaon